Rohit Pawar : राज्यात पवार भाजपला परवडणारे नाहीत म्हणूनच अजितदादांना सोबत घेतलं असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. अजित पवार गटाच्या नेत्यांकडून सडकून टीका केली जात आहे तर शरद पवार गटाच्या नेत्यांकडूनही चांगलाच समाचार घेतला जात आहे. अशातच आता आमदार रोहित पवार यांनी थेट अजितदादांबद्दलच मोठं विधान केलं आहे.
रोहित पवार म्हणाले, भाजपला पवार परवडणारे नाहीत म्हणूनच अजितदादांना सोबत घेतलं आहे. आत्तापर्यंत अनेक नेते भाजपने सोबत घेतलेत. पक्षही घेतलेत नंतर त्यांना संपवलं आहे. मागील काही दिवसांपासून अजितदादांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. लोकसभेपर्यंत सर्व पक्षांचा वापर भाजपकडून करण्यात येईल त्यानंतर याच लोकांना विधानसभा निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर लढवावी लागणार असल्याचं भाकीतही रोहित पवार यांनी केलं आहे. तसेच पवार विरुद्ध पवार करण्याची भाजपची इच्छा आहे. त्यामुळेच भाजप अजित पवार यांना स्क्रिप्ट वाचायला देत आहेत. अजितदादांनी जर ही स्क्रिप्ट वाचली नाहीतर कारवाई होणारच असल्याचंही रोहित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
Box Office Collection: ‘सालार’ समोर ‘डंकी’ फिका, जाणून घ्या चौथ्या दिवसाची कमाई
निवडणुक आयोग भाजपच्याच हिंमतीवर चालत असल्याचा दावा काही नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळेच ते राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आमच्याकडेच राहणार असल्याचं म्हणत आहेत. निवडणूक आयोगाची मालकी भाजपची आहे, यासंदर्भात विधेयक संसदेत आणलं आहे. त्यामुळे आता भाजपचेच मंत्री हे सर्व यंत्रणा चालवतील. ही तर सुरुवात आहे पुन्हा भाजप सत्तेत आलं तर संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही. यासंदर्भात भाजपचे नेते अनेकदा बोललेल आहेत. राष्ट्रवादीच्या सुनावणीनंतर
दूध का दूध पाणी का पाणी कळेलंच, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
शरद पवारांनी स्वत:च्या हिमतीवर पक्ष उभा केला आहे. यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शनानेच 38 व्या वर्षी अनेकांनी एकत्रित येऊन निर्णय घेतला होता. आज अजित पवार गटातील नेते हे शरद पवार यांच्यामुळेच सत्तेत बसले आहेत. सत्तेत असल्यावर त्यांना असं वाटतयं की, स्वत:मुळेच सत्ता मिळालीयं पण लोकांमुळे सत्ता येत असते हे त्यांनी विसरु नये, असा खोचक सल्लाही रोहित पवारांनी अजित पवार गटाला दिला आहे.