पुणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने सर्वच राजकीय नेते आठवणी सांगून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करत आहेत. याच निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त एका व्हिडीओच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यात आली आहे.
या व्हिडीओमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या भेटीविषयी बोलत आहेत. त्यात राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या भेटीत नक्की काय झालं ? याविषयी राज ठाकरे बोलले आहे.
या व्हिडिओला “जा लढ, मी आहे… काही मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात… राजसाहेबांचा वंदनीय बाळासाहेबांशी अखेरचा ‘राज’कीय संवाद !” असं कॅप्शन देत मनसेच्या ट्विटरयावरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ट्वीट करण्यात आलेल्या व्हीडिओमध्ये राज ठाकरे म्हणताना दिसतात की, “मला आजही ती गोष्ट आठवते की जेव्हा बाळासाहेबांना कळलं, की हा काही राहत नाही पक्षात आता. माझी शेवटची भेट होती. मी आपर्यंत कधी बोललो नाही तुम्हाला ही गोष्ट पण निघताना माझ्याबरोबर तेव्हा मनोहर जोशी होते, मनोहर जोशी रूमच्या बाहेर गेले आणि ते रूमच्या बाहेर गेल्यावर मला बाळासाहेबांनी बोलावलं, माझ्यासमोर हात पसरले आणि मला मिठी मारली आणि म्हणाले आता जा. त्यांना समजलं होतं.”
जा लढ, मी आहे…
काही मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात…
राजसाहेबांचा वंदनीय बाळासाहेबांशी अखेरचा 'राज'कीय संवाद ! pic.twitter.com/q6FYy9SmDP— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) January 23, 2023
याच व्हिडीओमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) पुढे म्हणतात की “जेव्हा मुलाखतकाराने मला विचारलं की भुजबळांचं बंड, नारायण राणेंचं बंड, शिंदेंचं बंडं आणि तुमचं बंड म्हटलं माझं बंड लावू नका त्यात. हे सगळेजण गेले हे एका पक्षात गेले आणि सत्तेत गेले. या तुमच्या राज ठाकरेने बाळासाहेब ठाकरे यांना भेटून त्यांना सांगून मी बाहेर पडलेलो आहे. त्यामुळे मी दगाफटका करून, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून असा नाही बाहेर पडलेलो आणि बाहेर पडून दुसऱ्या कुठल्याही पक्षात गेलो नाही. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला.”