Download App

राज ठाकरे अयोध्येला आल्यास स्वागत करू, खासदार बृजभूषण सिंह नरमले

पुणे : राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत प्रवेश करु देणार नाही, अशी भूमिका भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावेळी घेतली होती. यावरुन राज ठाकरे विरुद्ध बृजभूषण सिंह असा वाद रंगला होता.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी खासदार बृजभूषण सिंह पुण्यात आले होते. यावेळी मनसे आणि राज ठाकरेंबाबत त्यांचा सूर अधिक मवाळ झालेला पाहायला मिळाला. राज ठाकरे अयोध्येला आल्यास त्यांचे स्वागत करू, अशी प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी बृजभूषण सिंह पुण्यात आले असताना त्यांनी पहिल्याच दिवशी राज ठाकरे यांच्यासोबतचा वाद आता जुना झाल्याचे देखील स्पष्ट केले होते.

बृजभूषण सिंह म्हणाले की, पुणे आणि महाराष्ट्राचे प्रेम उत्तरप्रदेशसोबत नेहमीच राहिले आहे. महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश दूर नाहीत. राज ठाकरे यांना जेव्हा मी विरोध केला तेव्हाची परिस्थिती वेगळी होती.

लोकांमध्ये राज ठाकरे यांच्या विरोधात प्रचंड आक्रोश होता. त्यामुळे मी त्यांना विरोध केला होता. राज यांनीही अयोध्येला न येण्याचा निर्णय घेतला. ही चांगली गोष्ट झाली.

बृजभूषण सिंह म्हणाले, राज ठाकरे जेव्हा अयोध्या दौऱ्यावर येतील तेव्हा मी त्यांचे स्वागत करेल. आम्हाला काहीच अडचण नाही. राज ठाकरे यांचा मी सैद्धांतिक मुद्यावर विरोध केला होता.

त्यांच्याशी माझे वैयक्तिक वाद नाही. उत्तर प्रदेशमधील असंख्य लोक महाराष्ट्रात येऊन आपली उपजीविका भागवतात. माझाही कधी महाराष्ट्राला विरोध नव्हता. असेही बृजभूषण सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

बृजभूषण सिंह राज ठाकरेंना उद्देशून म्हणाले होते की, माफी मागितल्याशिवाय राज ठाकरे अयोध्येत प्रवेश करु शकत नाही. लष्कर आणि मिलिट्री घेऊन आले तरी राज ठाकरेंना अयोध्येत घुसू देणार नाही.

राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितली नाही, तर आज नव्हे तर राज ठाकरे यांना त्यांच्या हयातीत कधीही यूपी, बिहार, झारखंडच्या भूमीवर उतरायचे असेल तर उत्तर भारतीय समाज त्यांना उघडपणे विरोध करेल, असेही बृजभूषण सिंह म्हणाले.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंह हे पुण्यातील महाराष्ट्र केसरी स्पर्धेची फायनल पाहण्यासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या दौऱ्याला विरोध न करण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली होती. याशिवाय त्यांच्या दौऱ्यावेळी कोणतेही आंदोलन न करण्याच्या सूचनाही मनसैनिकांना देण्यात आल्या होत्या.

Tags

follow us