Mla Rohit Pawar : नीट पेपर लिकचा वाद मिटत नसल्याची चिन्हे असतानाच आता एमपीएससी औषध निरीक्षक भरतीही वादात सापडली आहे. 20 मार्च रोजी एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदासाठीचा पेपर फुटला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Mla Rohit Pawar ) यांनी केला आहे. एवढंच नाही तर नीट पेपर सेट करणारा जसा फुटला तसाच एमपीएसीचा पेपर सेट करणारा फुटला असल्याचाही गंभीर आरोप आमदार पवार यांनी केला आहे. पवार यांनी पत्रकार परिषद घेत अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेणार असल्याचंही स्पष्ट केलंय.
पत्रकार परिषदेत बोलताना आमदार पवार यांनी सरकारच्या काळ्या अध्यायाची मालिकाच सांगितली आहे. मागील अनेक वर्षांत झालेल्या भरतीमध्ये पेपरफुटी झाला असल्याचाही दावा रोहित पवार यांनी केला आहे. 27 जून 2026 ला टीईटी पेपर फुटला होता, त्यानंतर 1 मे 2026 रोजी नीटचा पेपर लिक झाला होता. मे 2026 मध्ये एसआरपीएफचा पेपर लिक झाला होता. 2024 ला जलसंधारणचा फुटला, सार्वजनिक बांधकाम विभागाचा 2023 साली फुटला होता. एवढंच नाही तर कोतवाल भरतीचाही पेपर लिक झाला होता, सिस्टिममध्ये आपल्या विचारांचे लोकं घालण्याचा सरकारचा हा डाव असल्याचा गंभीर आरोप आमदार पवार यांनी यावेळी केला आहे.
तसेच 29 जुलै 25 ला औषध निरीक्षकपदाची जाहीरात आली होती. 22 मार्च 2026 ही परिक्षेची तारीख होती. या परीक्षेसाठी एकूण 44, 500 विद्यार्थी बसले होते. या परीक्षेच्या निकालाची तारीख 12 जून 2026 होती. तात्पुरती गुणवत्ता यादी 22 जुलै 2026 ला जाहीर करण्यात आली. या भरतीत पात्र उमेदवार 506 होते त्यापैकी 150 उमेदवारांची निवड होणार होती, असंही रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
पेपरफुटीचा घोटाळा उघड कसा झाला?
नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमी हा एकच क्लास आहे. क्लासमधून परीक्षार्थी उमेदवाराच्या पालकाने पेपर घेतला. 20 मार्च 2026 रोजी परीक्षार्थी उमेदवाराच्या मोबाईलवर प्रश्नांची पीडीएफ कॉपी आली. परीक्षार्थी उमेदवाराने आपल्या मित्रांना पीडीएफ पाठवल्या, आणि प्रकार समोर आला. क्लासेसच्या माणसाला पैसे दिल्यानंतर तो माणूस व्हॉट्सअपवर प्रश्न पाठवायचा नंतर तो डिलीट करायचा, असा गैरप्रकार झाला असल्याचा आरोप आमदार पवार यांनी केला आहे.
दरम्यान, पैसे देऊन एखादा पेपर विकत घेऊन निरीक्षक झालेला अधिकारी असेल तर तो पैसे वसूल करण्याचं काम आधी करेल. या पदावर कोणी पैसे देऊन कोणी गेलं तर अनेक अडचणी येऊ शकतात. खोकल्याचे बनावट औषधे दिल्याने 22 बालाकांचा मृत्यू झाला असल्याचा प्रकार महाराष्ट्रात घडला असल्याचंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय.
