Mumbai’s ‘Musical Road’ in the midst of controversy : मुंबईमध्ये नुकतेच सुरू करण्यात आलेले भारतातील पहिले म्यूजिकल रोड अवघ्या महिनाभरातच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या रस्त्यात कोणताही तांत्रिक बिघाड झालेला नसला तरी, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या संगीताच्या आवाजामुळे परिसरातील 650 हुन अधिक कुटुंबे त्रस्त असल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
पॉश मानल्या जाणाऱ्या बरीच कँडी परिसरातील नागरिकांच्या मते, या रस्त्यावर सकाळी सुमारे 6 वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत मोठ्या आवाजात संगीत ऐकू येत असते. त्यामुळे परिसरातील शांतता भंग होत असून दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. मेलोडी रोडमुळे परिसरातील रहिवाशांना मोठा त्रास होत असून यामुळे कोणतीही सार्वजनिक गरज पूर्ण होत नाही, असे देखील नागरिकांचे म्हणणे आहे. या संदर्भात रहिवाशांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून ही समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे.
‘जय हो’ची धून सतत ऐकू येत असल्याची तक्रार
नगर आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात नागरिकांनी नमूद केले आहे की, संगीतकार ए. आर. रहमान यांच्या प्रसिद्ध जय हो या गाण्याची धून सकाळी 6 वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत कोस्टल रोडच्या उत्तरेकडील भागात सतत ऐकू येते. हा रास्ता घनदाट लोकवस्तीच्या निवासी भागातून जात असल्याने रात्रीच्या वेळी आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू येतो आणि त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. नागरिकांचे म्हणणे आहे की, खिडक्या बंद केल्यानंतर देखील हा आवाज घरात स्पष्टपणे ऐकू येतो. त्यामुळे ध्वनिप्रदूषण वाढत असून त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर होत आहे.
युद्धाचा शेअर बाजारावरच ‘बॉम्ब’; गुंतवणूकदारांना 31 लाख कोटींचा फटका, कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक नुकसान ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले उद्घाटन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 11 फेब्रुवारी रोजी या संगीतमय रस्त्याच्या एका भागाचे उदघाटन केले होते. या रस्त्यावर विशिष्ट वेगाने वाहन चालवल्यास संगीत ऐकू येण्यासाठी विशेष खाचे तयार करण्यात आले आहेत. जगात अशा प्रकारचा हा पाचवा आणि भारतातील पहिलाच म्यूजिकल रोड असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. सुरुंगाच्या आत येण्यापूर्वी 500 मीटर, 100 मीटर आणि 60 मीटर अंतरावर सूचना फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना पुढे म्यूजिकल रोड आहे आणि त्यासाठी आवश्यक वेग किती ठेवायचा याची पूर्वकल्पना मिळते.
BMC करणार आवाजाची तपासणी
दरम्यान बृहमुंबई महानगरपालिकेने या रस्त्यामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सर्वात जवळच्या निवासी इमारतीतून ऐकू येणाऱ्या आवाजाचा डेसिबल स्तर मोजला जाणार आहे. महापालिकेने आपल्या तांत्रिक सल्लागारांना या प्रकल्पाचा अभ्यास करून, प्रकल्पाचे उद्दीष्ट कायम ठेवत आवाजाचा परिणाम कमी करण्यासाठी उपाय सुचविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच परिसरातील रहिवाशांना त्यांची समस्या लवकरच सोडवली जाईल, असे आश्वासन देखील देण्यात आले आहे.
