Nagpur Graduates constituency : नागपूर विभागीय पदवीधर (Nagpur Graduates constituency) मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपसमोर बंडखोरीचे नवे आव्हान उभे राहणार आहे. भाजपने माजी आमदार सुधाकर कोहळे (Sudhakar Kohale) यांनी उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर माजी आमदार आणि माजी महापौर अनिल सोले (Anil Sole) यांनी नाराजी व्यक्त करत थेट बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचा निर्णय मान्य न करता निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय सोले यांनी घेतलाय. सोमवारी उमेदवारी दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपूर्वीपर्यंत पक्षातील संभाव्य बंडखोरांची मनधरणी करणाऱ्या सोले यांनीच आता बंडाचा झेंडा हाती घेतल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चिंता वाढली आहे. नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात भाजपची पकड मजबूत केली होती. अनिल सोले या मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहे. परंतु मागील वेळी त्यांना डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय संदीप जोशी यांना उमेदवारी दिली होती. परंतु काँग्रेस अभिजित वंजारी यांना जोशी यांचा पराभव करत मतदारसंघ खेचून आणला होता.
Drishyam: The Conclusion : बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई; दोन दिवसांत 179 कोटींचा गल्ला
मागील अनुभव लक्षात घेता यावेळी पक्ष पुन्हा आपल्यावर विश्वास दाखवेल, अशी अपेक्षा सोले समर्थकांना होती. मात्र, भाजपने सुधाकर कोहळे यांच्या नावाची घोषणा केल्याने सोले यांना मोठा धक्का बसला. सलग दुसऱ्यांदा उमेदवारी नाकारल्याने पक्षात आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षभरापासून सुधाकर कोहळे यांच्या उमेदवारीसाठी पक्षांतर्गत जोरदार तयारी सुरू होती. त्याचवेळी अनिल सोले यांनीही मतदारसंघात संपर्क वाढवत आपली दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मात्र त्यांनी माघार घेण्याऐवजी थेट निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
सोले यांना भाजपमधील अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा आणि नेत्यांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. त्यामुळे सोले यांनी प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यास भाजपसाठी ही निवडणूक अधिक कठीण होण्याची शक्यता आहे.
आता पक्षश्रेष्ठी सोले यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी ठरतात का, की ते बंडखोरी कायम ठेवून स्वतंत्रपणे निवडणूक लढवतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सोले यांच्या भूमिकेमुळे नागपूर पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचे राजकीय समीकरणही बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
