Download App

कर्नाटकपेक्षाही महाराष्ट्राचे सरकार हे भ्रष्टाचारी, पटोलेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

Nana Patole criticizes On BJP Party : कर्नाटक विधानसभेत काँग्रेसला विजयी करून जनतेने भाजपविरोधात आपला राग व्यक्त केला आहे. तसेच मोदी आणि शाह यांच्याविषयी असलेला राग त्यांनी निकालाद्वारे स्पष्ट केला. असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. महविकास आघाडीची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडीची आज बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, भाई जगताप, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्यासह अनेक नेतेमंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान मविआची बैठक पार पडली व त्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना त्यांनी कर्नाटक विधानसभा निवडणूक यावर देखील भाष्य केले.

पटोले म्हणाले, कर्नाटकात काँग्रेसचा झालेला विजय आपण सर्वानी पहिले आहे. कर्नाटकी जनतेच्या मनात भाजपाविरोधात राग होता, मोदी – शाह यांच्याविषयी राग होता तोच राग निकालाच्या माध्यमातून बाहेर आला आहे. ज्याप्रमाणे कर्नाटकात भ्रष्टाचार हा शब्द पाठ झाला होता. त्याच्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील खोके हा शब्द पाठ झाला आहे. कारण कर्नाटकपेक्षा महाराष्ट्राचे सरकार हे भ्रष्टाचारी आहे.

महाराष्ट्रातील सरकार हे जनतेच्या पैशांची लूट करत आहे. येत्या काळात महाराष्ट्रात असलेले हे असंवैधानिक सरकारचे पानिपत कसे करता येईल? तसेच राज्यातील सत्तासंघर्षांवर सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय व विधानसभा अध्यक्षांनी याबाबत घ्यावयाचा निर्णय हे देखील स्पष्ट होईल.

महाविकास आघाडीची वज्रमूठ पुन्हा आवळणार; जयंत पाटलांनी सांगितलं बैठकीत काय घडलं ?

जेव्हापासून राज्यात हे सरकार अस्तित्वात आले तेव्हापासून हे असंवैधानिक सरकार आहे. तसेच तत्कालीन राज्यपालांनी घेतलेले निर्णय यावर देखील कोर्टाने ताशेरे ओढले होते. शाहू – फुले- आंबेडकरांच्या महाराष्ट्रात भाजपने केलेले पाप त्याचे परिणाम देखील भाजपला भोगावे लागणार आहे.

आजच्या बैठकीत आम्ही कर्नाटक निकालावर चर्चा केली. तसेच आगामी वज्रमूठ सभा पुण्यात घेणार आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. तसेच कर्नाटक जनतेने भाजपला कसे नाकारले याबाबत देखील आम्ही त्या सभेत बोलणार आहोत. आमचा एकच ध्येय आहे भाजप सारख्या भ्रष्टाचारी व लोकशाहीला न मानणाऱ्या पक्षाला निवडणुकीच्या माध्यमातून कसा धडा शिकवता येईल यावर आज बैठकीत चर्चा करण्यात आली आहे, असं पटोले म्हणाले आहे.

Tags

follow us