Download App

Naresh Mhaske : ताब्यात घेतलेली शाखा प्रतापराव सरनाईकांनी बांधली, ठाकरे गटाचा संबंध तरी काय?

  • Written By: Last Updated:

ठाणे : निवडणूक आयोगाने शिवसेना (Shiv Sena) नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. शिंदे गटाकडून अधिकृतपणे शिवसेनेचं नाव वापरलं जातं. त्यामुळे त्यांच्या शिंदे गटाचे कार्यकर्ते हे ठिकठिकाणच्या शाखा ताब्यात घेण्यासाठी आक्रमक झाले आहेत. ठाण्यात शिवसेना शाखेवरून ठाकरे गट आणि शिंदे गटात राडा (Rada in Thackeray group and Shinde group) झाला होता. ही घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा ठाण्यामध्ये शिवसेना आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले. ठाण्यातल्या शिवाई नगर शाखेवरुन हा वाद पेटला.

दरम्यान, या शाखेविषयी बोलतांना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी सांगितलं की, शाखा ताब्यात घेण्याचा विषयी नाही. ही शाखा आमचीच आहे. धर्मवीर आनंद दिघेंनंतर ठाण्याची सगळी जबाबदारी एकनाथ शिदें सांभाळत होते.. येथील नगरसेवक आमच्यासोबत आहेत. त्यामुळे इतर कुणीही त्यावर दावा करु शकत नाहीत, ही शाखा स्थानिक आमदार प्रतापराव सरनाईक यांनी बांधली. त्यामुळे ठाकरे गटाचा या शाखेशी संबंध तरी काय? असा सवाल म्हस्के यांनी केला आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना असं सांगितल्या जात आहे. मात्र, हा वाद अद्यापही सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. सुप्रीम कोर्टाकडून सत्ता संघर्षावर अद्यापही कोणतीही सुनावणी झालेली नाही. दरम्यान, शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटांमध्ये अनेक पातळ्यांवर वाद निर्माण झालेले पाहिला मिळत आहेत.

ठाण्यात पुन्हा ठाकरे आणि शिंदे गट भिडले; जाणून घ्या वादाचे कारण

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या शिवाई नगर येथे गेले 35 वर्षांपासून शिवसेनेची शाखा सुरु आहे. दरम्यानच्या काळात सेनेत बंडाळी झाल्यानं ही शाखा बंद ठेवण्यात आलेली होती. त्यानंतर शिंदे गटाचे नरेश म्हस्के हे आज आपल्या कार्यकर्त्यांसह या शाखेवर आले आणि त्यांनी शाखेचं कुलूप तोडले. आणि शाखा ताब्यात घेतली आहे. हा प्रकार घडल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी दोन्ही बाजुचे आक्रमक झाले आहेत. मात्र, नरेश म्हस्के यांनी या शाखेवर शिंदे यांच्या शिवसेना कार्यकर्त्यांचा हक्क असल्याचा दावा केलेला आहे.

Tags

follow us