Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यंदा (Rahul Gandhi) दोन मतदारसंघातून निवडून आले आहेत. रायबरेली आणि वायनाड या मतदासघांतील जनतेने त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. परंतु, नियमानुसार त्यांनी अखेर वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिला. या रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीचा (Lok Sabha Election) कार्यक्रम जाहीर झालेला नाही. मात्र त्याआधीच या मतदारसंघातून काँग्रेसने प्रियांका (Priyanka Gandhi) गांधी यांचं नाव जाहीर केलं आहे. मात्र यानिमित्ताने दोन मतदारसंघातील खासदारकीचा मुद्दा समोर आला आहे. असा कोणता नियम आहे ज्यामुळे दोन मतदारसंघातून निवडून आलेल्या उमेदवाराला एका खासदारकीचा राजीनामा द्यावा लागतो याची माहिती घेऊ या..
लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी रायबरेली (Raebareli Constituency) मतदारसंघातून 3 लाख 90 हजार मतांनी तर वायनाड (Waynad) मतदारसंघातून 3 लाख 64 हजार मतांनी विजयी झाले आहेत. आता नियमानुसार राहुल गांधींनी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर 14 दिवसांच्या आत दोनपैकी एक जागा सोडण्याचा नियम आहे. जर या 14 दिवसांच्या आत कोणत्याही एका मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा संबंधित उमेदवाराने दिला नाही तर दोन्हीही मतदारसंघ रिक्त मानले जातात.
मोठी बातमी! राहुल गांधी खासदारकीचा राजीनामा देणार, प्रियांका गांधी लढणार पोटनिवडणूक
त्यामुळेच काल अखेरच्या दिवशी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राहुल गांधी वायनाड मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर राहुल गांधींनी या मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा लोकसभा सचिवालयाकडे सुपूर्द केला. जर कोणताही सदस्य राजीनामा देऊ इच्छित असेल तर त्याला लोकसभेच्या अध्यक्षांना लिखित स्वरूपात राजीनामा द्यावा लागतो. संबंधित सदस्याच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेण्यात यावी अशी तरतूद आहे.
राहुल गांधींच्या कार्यालयाने याबाबतीत सर्व माहिती लोकसभा सचिवालयाकडून आधीच घेतली होती. लोकसभेच्या महासचिवांनी राजीनामा स्वीकारल्यानंतर यास लोकसभा बुलेटिन अथवा गॅझेटमध्ये प्रकाशित करण्यात येईल. याची एक प्रत केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात येईल. यानंतर निवडणूक आयोगाकडून संबंधित मतदारसंघात पोट निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येते.
Rahul Gandhi: ईव्हीएम हे ब्लॅक बॉक्स; राहुल गांधींचं ट्वीट, वायकरांच्या बातमीचं जोडलं कात्रण
दरम्यान, लोकसभा निवडणुका होईपर्यंत राहुल गांधी वायनाडचे खासदार होते. आताच्या निवडणुकीतही त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला. यासोबतच उत्तर प्रदेशातील रायबरेलीतही विजयी झाले. रायबरेली हा गांधी परिवाराचा पारंपरिक मतदारसंघ आहे. आता या दोन्ही मतदारसंघांतील वायनाड मतदारसंघ राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर रिक्त झाला आहे. या मतदारसंघातून काँग्रेसने प्रियांका गांधी यांचं नाव पुढे केलं आहे.