Ajit Pawar On Eknath Shinde : राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. यावेळी ते सातारा येथे बोलत होते. त्यांनी बोलताना सरकार लोकांचा पैसा जाहिरातबाजी करण्यात खर्च करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा देखील समाचार घेतला आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त चिठ्ठ्या वाचून दाखवतात. मला चिठ्ठी देण्याची कोणी हिंमतदेखील करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी एखाद्या छोट्या चिठ्ठीवर किंवा पॉइंटवर बोलावे. पण तुमचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातील 13-14 कोटी जनतेचा अपमान आहे, असे ते म्हणाले.
यांना कशाचे काही तारतम्यच नाही आणि काही झाले की मग दोन-तीन दिवस सातारला येऊन राहतात. इथे आल्यावर स्ट्रॉबेरीकडे पाहत बसतात. नुसतं स्ट्रॉबेरीकडं पाहून शेती होत असती का, असे म्हणत अजितदादांनी एकनाथ शिंदेंची नक्कल केली आहे. तसेच तीन दिवस काय केलं असं विचारलं तर यांच्या ऑफिसकडून उत्तर येतं, की 65 फाईल्स काढल्या. यांना 65 फाईल्स काढायला तीन दिवस लागले. आम्ही दोन-तीन तासांमध्ये 65 फाईल्स काढतो. सध्या राज्यामध्ये हजारो फाईल्स पेंडिंग आहेत, असे शब्दात अजितदादांनी शिंदेंना सुनावले आहे.
सध्याच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे रेट ठरलेले आहेत. सत्ता असताना सत्तेचा माज आम्ही होऊन दिला नाही. सत्तेची मस्ती डोक्यात जाऊन दिली नाही. त्यामुळे अधिकारी आजही आमचा आदर करतात. आज मंत्री कुणाला विचारत नाही. मंत्रालयात बसत नाही, अशी टीका अजितदादांनी केली आहे.