बारामती : मी काही मंत्रिमंडळाच्या बैठकीला जात नाही, जाण्याचं काही कारणही नाही. पण महाराष्ट्रात सध्या दोन उपमुख्यमंत्री आहेत. एकाचं मत तुम्ही सांगितलं, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यावर एक स्टेटमेंट केलं. मात्र यावरुन असं स्पष्ट दिसून येत की जेव्हा याबाबतचा निर्णय झाला त्या बैठकीला आज सरकारमध्ये असलेले अनेक सहकारी उपस्थित होते आणि त्यांची सहमती होती. पण ते आता याबाबत भाष्य करत नाहीत, असं म्हणत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.
कंत्राटी भरती प्रक्रियेला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद होता, असे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. या आरोपांबाबत विचारले असता पवार यांनी अजित पवार यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्याकडे अंगुली निर्देशन केले. ते बारामतीमध्ये बोलत होते. (NCP National President Sharad Pawar Responds to Deputy Chief Minister Devendra Fadnavis’ Allegations on Contractual Recruitment)
या आरोपांवर प्रत्युत्तर देताना शरद पवार सुरुवातील हलकेच हसले आणि म्हणाले, माझा आशीर्वाद हे मी वाचलं. पण मी काही मंत्रिमंडळाच्या बैठकीला जात नाही, जाण्याचं काही कारणही नाही. पण महाराष्ट्रात सध्या दोन उपमुख्यमंत्री आहेत. एकाचं मत तुम्ही सांगितलं, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यावर एक स्टेटमेंट केलं. मात्र यावरुन असं स्पष्ट दिसून येत की जेव्हा याबाबतचा निर्णय झाला त्या बैठकीला आज सरकारमध्ये असलेले अनेक सहकारी उपस्थित होते आणि त्यांची सहमती होती. पण ते आता याबाबत भाष्य करत नाहीत.
एकंदरितच कंत्राटी कामगारांसंबंधी अस्वस्थता कशासंबंधी होती, तर नोकरीमध्ये खात्री नाही. एका ठारविक काळापुरती नोकरी आहे. 10-11 महिने नोकरी मिळाल्याने त्या व्यक्तीच्या जीवनात स्थैर्य नाहीये. म्हणून कंत्राटी पद्धतीने जागा भरण्यास आमचा विरोध होता आणि त्या बद्दलची भूमिका आम्ही मांडली. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी मतं मांडली त्यामध्ये यापूर्वीच्या त्यांच्या सरकारने किंवा त्यांच्या सरकारमध्ये असलेल्या लोकांनी या निर्णयाला संमती दिली होती आणि त्यांच्या संमतीने हे निर्णय झाले होते ही गोष्ट लपवण्याला अर्थ नाही, असंही शरद पवार म्हणाले.