महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी ( Maharashtra Governer ) आता रमेश बैस ( Ramesh Bais ) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बैस हे झारखंड राज्याचे राज्यपाल म्हणून काम करत होते. रमेश बैस यांचा गेल्या काही दिवसांपासून झारखंड सरकारसोबत संघर्ष सुरू होता. झारखंड येथे झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे सरकार राज्यामध्ये आहे. बैस यांच्या या नियुक्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे. महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच महाराष्ट्रात नवीन राज्यपाल येणार या वृत्ताचे आम्ही स्वागत करतो.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 12, 2023
महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर आपली भूमिका ट्वीट करत स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच महाराष्ट्रात नवीन राज्यपाल येणार या वृत्ताचे आम्ही स्वागत करतो असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. मुर्मू एकाच वेळी १३ राज्यपालांची बदली केली आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे ट्विट केले आहे. नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत, अशी आशा जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा- सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो ! या महामानवांचा जयघोष जयंत पाटील यांनी केला आहे.