Download App

एकेकाळीचे नाशिकसम्राट गिरीशभाऊ नाशिकमध्येच कात्रीत अडकले

प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समाजले जाणारे आणि एकीकाळी नाशिकचे सर्वेसर्वा गिरीश महाजन यांची त्याच नाशिक जिल्ह्यात कोंडी झाली आहे. गिरीश महाजन एकेकाळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होते. यावेळी अथक प्रयत्न करुन देखील नाशिकचे पालकमंत्रिपद महाजन यांना मिळू शकलं नाही. दादा भूसे यांचा शब्द मुख्यमंत्री यांनी खाली पडू दिला नाही. दादा भूसे पालकमंत्री झाले.एकेकाळी गिरीश महाजन यांचा डीपीडीसीवर असलेली पकड कमकुवत झाली.

जिल्ह्यात DPDC मध्ये एक हजार कोटींचा निधी मिळतो. या निधीत सर्वसाधारण 600 कोटी, आदिवासी उप योजना, समाजकल्याण 100 कोटी असा विभागाला जातो. या निधीत काम सुचवताना भूसे यांनी एक साधा फोन देखील गिरीश महाजन याना केला नसल्याचं एका पदाधिकाऱ्यानं नाव न सांगन्याच्या अटीवर सांगितलं. हा जिल्हा नियोजनाचा निधी अर्थमंत्री यांना देखील थांबवता येत नाही अथवा त्यात कपात करता येत नाही. म्हणून ही महाजन यांची कोंडी होतेय का? अशीही चर्चा आहे.

शहरात भाजपच्या शहरातील तीन आमदारांची निधीअभावी पुरती कोंडी झाली आहे. गिरीश महाजन पालकमंत्री असताना निधी वाटपावेळी दादा भूसे यांच्या कामांना विशेष प्राधान्य देत असत. असं असताना भूसेंकडून महाजन यांची कोंडी का? असा प्रश्न उपस्थित होतोय. दुसरीकडं महसूलमंत्री विखे पाटील यांनी नगरवरुन आपला मोर्चा नाशिककडं वळवला आहे. गेल्या अनेक वर्षात घोटीमार्गे मुंबईत जाणारे विखे पाटील यांनी आपला मार्ग बदललाय. विखे पाटील आता नाशिक मार्गे मुंबईत जात आहेत. गिरीश महाजन यांच्या अतिशय जवळच्या कार्यकर्त्यांच्या जमिनीच्या व्यवहारांवर विखे बारीक लक्ष ठेऊन असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात तिन्ही नेते मुक्कामी होते. जिल्ह्याच्या शासकीय रेस्ट हाऊसमध्ये बुकिंग करताना दोन व्हीआयपी सुट कोणाला द्यायचे? अशा संकटात अधिकारी अडकले. यावेळी एक सुट दादा भूसे आणि दुसरा सुट विखे पाटील यांना देण्यात आला. यावेळी कुठलाही बडेजाव न करता महाजन यांनी हा विषय मिटवला.

Nashik BJP Meet : चर्चा तर होणारच.. भाजप बैठकीसाठी फडणवीस-पंकजा मुंडे एकाच कारमधून

महानगरपालिकेच्या निधी बाबतही भूसे आता लक्ष देऊ लागल्याने भाजप नेत्यांची कोंडी झाली आहे. महापालिकेत भाजपची सत्ता होती. आता प्रशासक आहे. अनेक बैठकीसाठी भूसे यांचं लक्ष ग्रामीणवरुन आता पालिकेत वळालं आहे. या ठिकाणी नियोजन करताना भाजपचे तिन्ही आमदार आणि गिरीश महाजन यांना विचारले जात नाही. अथवा त्यांनी जिल्हा नियोजनात सुचवलेले विषय कार्यक्रमामध्ये येत नाहीत. भाजपच्या आमदार बैठकीत अनेक प्रश्न तावातावाने मांडतात, पण पालकमंत्री आता पुढचा विषय घ्या, असं बोलून विषय संपवतात, असं एका पदाधिकाऱ्यानं सांगितलं.

एकेकाळी नाशिकसम्राट म्हणून वावरणारे गिरीश महाजन हे भूसे आणि विखे यांच्या कात्रीत अडकले का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

Tags

follow us