औरंगाबादः “सर्व्हेवर अंदाज बांधता येत नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पावसात एक सभा झाली होती. त्या सभेने सगळे गणित बदलून टाकले.” असं म्हणत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ (sanjay shirsat) यांनी सी वोटरच्या सर्वेवर प्रतिक्रिया दिली आहे.
नुकत्याच आलेल्या सी वोटर ‘मूड ऑफ द नेशन’ या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला ३४ जागा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. त्यावर बोलताना संजय शिरसाठ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वेवर बोलताना संजय शिरसाठ म्हणाले की, “सर्व्हेवर अंदाज बांधता येत नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची पावसात एक सभा झाली होती. त्या सभेने सगळे गणित बदलून टाकले. त्या सभेने सर्व सर्व्हे गुंडाळून टाकले होते. त्या सभेनंतर पश्चिम महाराष्ट्रात वेगळे वातावरण तयार झाले होते. तेथील उमेदवारदेखील पावसाला आताच यायचं होतं का? असे म्हणत होते. सर्व्हेचा अंदाज फक्त त्यांच्या समाधानासाठी चांगला आहे.”
२०१९ साली झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील यांच्यासाठी शरद पवार यांनी साताऱ्यात पावसात सभा घेतली होती. ही सभा तेव्हा चर्चेचा विषय ठरली होती. या सभेनंतर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बदलले होते. याची शिरसाठ यांनी आठवण करून दिली आहे.