माझ्या विचारांशी राजकारण जुळलं नाही तर एक्झिट घेईन; पंकजा मुंडे यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत

विशेष म्हणजे, मंत्री पंकजा मुंडे यांनी यापूर्वीही अनेकदा आपल्या राजकीय भूमिकांबाबत स्पष्ट आणि परखड मत व्यक्त केले आहे.

Untitled Design   2026 08 03T091119.129

Untitled Design 2026 08 03T091119.129

Pankaja Munde hints at retirement from politics : बीड जिल्ह्यातील परळी येथे आयोजित कवी संमेलनाच्या समारोप सोहळ्यात मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कार्यक्रमादरम्यान एका कवीने राजकारणातील विसंगती, विलंब आणि व्यवस्थेतील त्रुटींवर भाष्य करणारी कविता सादर केली. या कवितेतील आशयाला पंकजा मुंडे यांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. मात्र, त्यानंतर त्यांनी केलेले भाष्य अनेकांच्या चर्चेचा विषय ठरले आहे.

कवितेचा संदर्भ देत पंकजा मुंडे म्हणाल्या, मला जर राजकारण माझ्यासारखं वाटलं नाही, माझ्या विचारांशी ते समरस नाही असं वाटलं, तर जसा समृद्धी महामार्गावर एक्झिट असतो तसा माझ्या राजकारणातही वेळोवेळी एक्झिट असेल. जो व्यक्ती बाहेर पडण्याची तयारी ठेवतो, तोच निर्भीडपणे आणि प्रामाणिकपणे राजकारण करू शकतो. त्यामुळेच मी त्या कवितेला टाळ्या वाजवून दाद दिली.

त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. काहींनी याकडे राजकीय निवृत्तीचा संकेत म्हणून पाहिले, तर काहींच्या मते हा विचारांशी तडजोड न करण्याचा आणि तत्त्वांशी प्रामाणिक राहण्याचा संदेश आहे. विशेष म्हणजे, पंकजा मुंडे यांनी यापूर्वीही अनेकदा आपल्या राजकीय भूमिकांबाबत स्पष्ट आणि परखड मत व्यक्त केले आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

केरळमध्ये 8 जणांचा मृत्यू ; कर्नाटक, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसाचा तडाखा

यावेळी त्यांनी निवृत्तीबाबत मनातील भावना देखील व्यक्त केल्या. कधी कधी निवृत्त व्हावंसं वाटतं. मात्र जनतेचा उत्साह, त्यांचं प्रेम, विश्वास आणि अपेक्षा पाहिल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते, असे त्या म्हणाल्या. परळी महामार्गाच्या दुरावस्थेबाबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. नागरिकांच्या समस्या, विकासकामांतील विलंब आणि त्यातून निर्माण होणारी नाराजी यावरही त्यांनी भाष्य केले.

पंकजा मुंडे यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सकारात्मक टीकेच्या महत्त्वावरही भर दिला. आपण अशा देशात राहतो जिथे व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्याला समान महत्त्व आहे. कलाकार, साहित्यिक आणि सामान्य नागरिकांना त्यांचे विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशा विचारस्वातंत्र्याच्या संस्कृतीत आपण वाढलो आहोत. एखाद्याने सत्य मांडले नाही म्हणून सत्य बदलत नाही. कोंबडा झाकल्याने सूर्य उगवणं थांबत नाही. त्यामुळे सकारात्मक टीका ऐकण्याची ताकद प्रत्येकामध्ये असली पाहिजे. त्यातून स्वतःमध्ये सुधारणा करण्याची तयारीही असायला हवी, असे त्या म्हणाल्या.

कवी संमेलनासारख्या सांस्कृतिक व्यासपीठावर केलेल्या या वक्तव्यामुळे पंकजा मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. विचारांशी तडजोड करावी लागली तर राजकारणातून बाहेर पडण्याची तयारी असल्याचे त्यांनी सूचकपणे सांगितल्याने त्यांच्या विधानाचे विविध अर्थ काढले जात आहेत. आगामी काळात त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून, राज्याच्या राजकारणात या विधानाची चर्चा आणखी रंगण्याची चिन्हे आहेत.

Exit mobile version