Download App

ठाण्यात मनपाची दुटप्पी कारवाई…सत्ताधाऱ्यांना सूट तर विरोधकांचे बॅनर उतरवले

Poster War In Thane : राज्यात आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग आला आहे. यातच सत्ताधाऱ्यांसह विरोधक देखील प्रचारासाठी जाहीर सभांचे आयोजन करत आहे. यातच विरोधी गट म्हणजेच महाविकास आघाडीकडून देखील आपल्या आगामी सभांचे बॅनरबाजी करण्यात येत आहे. मात्र ठाण्यात महानगरपालिकेकडून विरोधकांच्या बॅनरवर कारवाई करण्यात येत आहे. तर सत्ताधाऱ्यांच्या बॅनरकडे पालिकेकडून कानाडोळा केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच या मुद्द्यावरून आव्हाड यांनी पालिकेच्या कामावर देखील ताशेरे ओढले आहे.

नेमकं काय म्हणाले आव्हाड?
ठाणे महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन! राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 1 मे रोजी होणाऱ्या वज्रमूठ सभेसाठी इतर पक्षाप्रमाणेच शहरामध्ये बॅनर्स लावण्यात आले होते. पण आज सकाळपासून ठाणे महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष अधिकारी सगळे बॅनर्स काढत फिरत आहेत.

अनेक ठिकाणी इतर वेगवेगळ्या पक्षाचे आणि खासकरून सत्ताधारी पक्षाचे बॅनर्स लागलेले आहेत. त्याला साधा हातही लावण्याची हिम्मत त्यांनी केलेली नाही. आम्ही काल रात्री बॅनर्स लावले आणि आज सकाळपासून ठाणे महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी हे बॅनर्स उतरवायला सुरुवात केली.

कारवाई करण्यात येत असलेल्या त्या अधिकाऱ्यांमध्ये आघाडीचे नाव भालेराव यांचे आहे. हे सदगृहस्थ आहेत. मी त्यांना स्वतः फोन केला पण त्या फोनचे देखील उत्तर त्यांनी दिलेले नाही. प्रशासनाने कसं वागाव हे काही आम्ही आता त्यांना समजवायला नको. जसं त्यांना सांभाळता तस आम्हांला ही सांभाळून घ्या, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनपाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली.

दरम्यान महाविकास आघाडीच्या आतापर्यंत दोन वज्रमूठ सभा पार पडल्या आहेत. या दोन्ही सभेला उपस्थितांची संख्या मोठी होती. यातच आगामी सभेसाठी देखील माविआच्या घटक पक्षांकडून तयारी सुरु आहे. मात्र यातच ठाणे महानगर पालिकेकडून करण्यात आलेल्या या दुटप्पी कारवाईवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली.

Tags

follow us