Prasad Lad Sanjay Raut Audio Clip: महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेल्या 500 कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून भाजप आमदार प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कारण संजय राऊत यांनी यापूर्वी ही ऑडिओ क्लिप भाजपच्या एका विधान परिषद आमदाराने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यापर्यंत पोहोचवल्याचा दावा केला. त्यावर प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली. ही बनावट ऑडिओ क्लिप ‘सामना’च्या कार्यालयातील स्टुडिओत तयार करण्यात आल्याचा दावा करत लाड यांनी राऊत यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापलं; मनोज जरांगे पाटलांचा मोठा दावा
“‘सामना’च्या कार्यालयातील स्टुडिओत ही बनावट ऑडिओ क्लिप तयार करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी संजय राऊत यांना उचलून त्यांची चौकशी केली पाहिजे. ‘सामना’च्या स्टुडिओत जाऊन या सगळ्याची चौकशी केली पाहिजे,” असं प्रसाद लाड म्हणाले. भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करत आहे, याचीही एसआयटीने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
या ऑडिओ क्लिपमध्ये एकनाथ शिंदेंनी भाजपकडून 500 कोटी रुपये घेऊन श्रीकांत शिंदेंच्या हस्ते जरांगेंना दिले, असा उल्लेख आहे. या क्लिपची सत्यता तपासण्यासाठी फॉरेन्सिक चाचणी केली जाईल, असं लाड यांनी म्हटलं. तसेच, क्लिप तयार करण्यासाठी संजय राऊत यांनी स्क्रिप्ट लिहिली आणि एआयच्या (AI) माध्यमातून आवाज तयार करण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, संजय राऊत यांनी यापूर्वी ही ऑडिओ क्लिप भाजपच्या एका विधान परिषद आमदाराने मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवल्याचा दावा केला होता. क्लिपमधील संभाषण भाजपच्या कोअर टीममधील व्यक्तींमध्ये झाल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता या प्रकरणावरून भाजप आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कथित ऑडिओ क्लिपची सत्यता आणि ती कोणी समोर आणली, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
