Prishviraj Chavan liked Devendra Fadnavis’ video : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रात भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू असल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट केले होते. हे ट्विट ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आहे. मात्र मोहित कंबोज यांच्या ट्विटला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लाईक केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
भाजप नेते मोहित कंबोज यांनी काही दिवसांपूर्वी म्हणजे 5 एप्रिलला त्यांच्या ट्विटरवर देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे, तू कोण होतास, तुझे काय झाले, कसे वाया गेले… अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली. त्यानंतर मोहित कंबोज यांनी ठाकरे यांच्या टीकेचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. मात्र सत्ताधारी वर्गाच्या विरोधात असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी कंबोज यांचे ट्विट लाईक केले आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या मनात काय आहे?
पृथ्वीराज चव्हाण यावर बोलताना म्हणाले कि, ‘नक्की काय झालंय ते मी तपासून बघतोय. इतक्या वर्षात मी कधीही असं काही केलं नाही, मला जर असं करायचं असतं तर मी खुल्या मंचावरुन केलं असतं, माझी भूमिका मांडण्यासाठी मी एखाद्या ट्विटला लाईक का करेन’, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून मिशन कमळ सुरू आहे. विरोधी पक्षातील काही आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर विधानसभेची संख्या घटते. तसेच बहुमताचा आकडाही कमी होतो. त्यानंतर त्या आमदारांना पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी हे ऑपरेशन लोटस आहे. महाराष्ट्रात असे करण्याचे प्रयत्न अनेक दिवसांपासून सुरू आहेत.