Prithviraj Chavan : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. आता कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी महायुती सरकावर जोरदार हल्लाबोल केला. काही राजकीय पक्ष समाजांमध्ये तेढ निर्माण करून निवडणुकीच्या तोंडावर जातीय, धार्मिक दंगली घडवण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी टीका चव्हाण यांनी केली.
कराड शहरात पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत झाली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. या मुलाखतीत त्यांनी मविआ 183 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण चिंताजनक आहे. महाराष्ट्रात बारा बलुतेदार समाज, मराठा समाज, दलित समाज असे सर्व समाज खेळीमेळीने राहात होते. त्यांच्यात कधीही तेढ निर्माण झाली नव्हती. मात्र, आता काही राजकीय पक्ष समाजांमध्ये तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळं महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य बिघडलं, असं चव्हाण म्हणाले.
रावेरच्या आखाड्यात ‘नव्या भिडूं’मध्ये कुस्ती; भाजपचा पैलवान ‘चौधरींना’ थांबवणार?
ते म्हणाले की, दलित समाजात बौद्ध आणि दलित तसेच हिंदू आणि दलित अशी विभागणी करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर जातीय, धार्मिक दंगली घटवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.
आरक्षण फडणवीस सरकार टिकवू शकले नाही…
मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिलं होतं. ते आरक्षण फडणवीस सरकार टिकवू शकले नाही. सध्या बेरोजगारीचा ज्वलंत प्रश्न राज्यात आहेत. लोकांच्या हाताला काम नाही, अशी स्थिती आहे. तसंच मागच्या दहा वर्षांत एकही मोठा उद्योग किंवा कंपनी महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी आलेली नाही. जे उद्योग येत होते ते गुजरातकडे पळवण्यात आले आहेत. महाराष्ट्रातलं वातावरण उद्योगस्नेही नाही, अशी परिस्थिती निर्माण कऱण्यात आली. बेरोजगारीमुळेच आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत 183 जागा जिंकू…
यावेळी त्यांनी निवडणुकींच्या संदर्भातही मोठं विधान केलं. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या. 65 टक्के जागा आम्ही जिंकलो. या गोष्टीचा विचार केला तर आम्ही विधानसभा निवडणुकीत 183 जागा जिंकू शकतो, महायुतीचा विचार केला तर ते तीन अंकी संख्याही गाठतील की नाही, अशी स्थिती आहे, असं चव्हाण म्हणाले.