पुणे : कसबा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली असून या मतदासंघात अखेर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाने भाजपचा (BJP) हा बालेकिल्ला काँग्रेसने हिसकावून घेतला आहे. या निवडणुकीत धंगेकरांना एकूण 72 हजार 599 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांना 61 हजार 771 मते मिळाली आहेत. यावर रवींद्र विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ही निवडणूक जनेतेने हातात घेतली होती. जनतेने ठरवले होते की, रवींद्र धंगेकरला विधानसभेत पाठवायचे. भाजपने इथे पैशाचा पाऊस पाडला. परंतु जनतेने येथे मतदानाचा पाऊस पाडलेला आहे. जनतेने इथे पैशावाल्यांना भीक घातलेली नाही, हे स्पष्ट दिसते आहे, असे धंगेकर म्हणाले.
तसेच यावेळी बोलताना त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. चंद्रकांतदादा हे मोठे नेते आहेत. ते कोल्हापूरहून पुण्याला आले आहेत. त्यांना येथील कार्यकर्त्यांची काय माहिती असणार, असे म्हणत त्यांनी चंद्रकांतदादांना टोला लगावला आहे. तसेच विजयानंतर मी गिरीश बापट यांना देखील भेटण्यासाठी जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
Election Results 2023 Live : नागालॅंड भाजपपुढे पण मेघालयमध्ये एनपीपी ठरणार मोठा पक्ष
कसबा पेठ विजयावर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय हा महाविकास आघाडीची एकजूट व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा विजय आहे.
जनमताचा हा कौल भाजप विरोधात आहे. हा जनशक्तीचा धनशक्तीवर विजय आहे. हा निकाल महाराष्ट्रातील वातावरण बदलल्याचे संकेत आहेत. काँग्रेस पक्षाने लोकप्रिय व सक्षम उमेदवार दिला आणि त्यांच्या विजयासाठी मतदारांनी सत्ता व पैशाची दडपशाही झुगारून लावली. नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि विजयासाठी परिश्रम घेणार्या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व मतदारांचे आभार.