Rahul Bondre join bjp : भाजपवासी झालेल्या काँग्रेस नेत्यांची यादी भलीमोठी झालीय. त्यात काही जण मंत्री आहेत. तर काही जण आमदार आहेत. राजकीय सोयीसाठी अनेक काँग्रेस नेते भाजपमध्ये गेले आहेत. त्यात आणखी एका माजी आमदाराचा नंबर लागलाय. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे (Rahul Bondre) हे भाजपमध्ये ( BJP) प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या जिल्ह्यातच काँग्रेसला मोठा धक्का आहे. पण सध्या कुठलेही मोठा निवडणूक नसताना बोंद्रे भाजपमध्ये का जात आहेत ? त्यांच्या भाजप प्रवेशाने कुणाचा फायदा होणार ? भाजपचे या मागे कोणते राजकीय गणित आहे हे जाणून घेऊया…
राहुल बोंद्रे हे चिखलीचे माजी आमदार आहेत. 2009 आणि 2014 असे सलग दोनवेळा काँग्रेसकडून ते आमदार झाले. पण गेल्या दोन निवडणुकीत भाजपच्या श्वेता महाले यांनी त्यांचा पराभव केला. राहुल बोंद्रे यांच्या शिक्षणसंस्था, अनुराधा नागरी सहकारी बँकेचे चिखलीमध्ये मोठे जाळे आहेत. रामकृष्ण परमहंस मौनीबाबा शिक्षणसंस्थेचे राहुल बोंद्रे हे अध्यक्ष आहे. संस्थेच्या अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी, इंजिनिअरिंग कॉलेज, नर्सिंग कॉलेज आहेत.
गुन्ह्यांमुळे राहुल बोंद्रे अडचणीत
अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेजच्या स्थापनेसाठी आणि मान्यतेसाठी वापरण्यात आलेल्या काही दस्तऐवजांच्या पडताळणीत कथित अनियमितता आढळून आली आहे. याप्रकरणी जून महिन्यांत तब्बल तीन गुन्हे राहुल बोंद्रे व शिक्षणसंस्थेच्या संचालकांविरुद्ध दाखल करण्यात आलेले आहे. फसवणूक करणे, बनावट कागदपत्र तयार करणे, बनावट कागदपत्राचा वापर आणि कट रचणे असे गंभीर गुन्हे त्यांच्याविरोधात आहेत. कथित गैरव्यवहार 1992 ते 2024 या कालावधीत झालेला आहे. राहुल बोंद्रेंविरोधात तक्रार झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर राहुल बोंद्रे हे तब्बल महिनाभर फरार होते. त्यानंतर ते पावसाळी अधिवेशनात मंत्रालयाच्या आवारात दिसून आले होते. त्यावेळी चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी थेट विधानसभा अध्यक्षांकडे फरार गुन्हेगार हे विधिमंडळ परिसरात येतात, अशी तक्रार केली होती. तसेच पतसंस्थांमधील गैरव्यवहारविरोधात विधिमंडळात महाले यांनी आवाज उठविला होता. त्यानंतर काही दिवसाने नागपूर खंडपीठाने त्यांना या गुन्ह्यात जामीन मंजूर केला होता. त्यानंतर ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! तब्बल 150 मंडळांना मुख्य मिरवणुकीत प्रवेश नाही
श्वेता महालेंचा प्रवेशाला ग्रीन सिग्नल
चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले हे शासकीय सेवेत आहेत. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव आहेत. आमदार श्वेता महाले यांच्या सहमतीनंतर बोंद्रे हे भाजपमध्ये येत असल्याचे स्थानिक पत्रकारांचे मत आहेत. बोंद्रे हे केवळ आपल्या शैक्षणिक संस्था सांभाळणार आहेत. ते राजकारणापासून अलिप्त राहतील, या अटीवरच त्यांचा भाजप प्रवेश होत असल्याची चर्चा आहे. बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे श्वेता महालेंविरोधात आक्रमक भूमिका घेत असतात. दोघांमध्ये तीव्र राजकीय संघर्ष सुरू झालेला आहे. त्यात गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड हे चिखली मतदारसंघात लक्ष घालत आहेत. त्यामुळेही बोंद्रे यांना भाजपमध्ये घेतल्यानंतर भाजपची ताकद वाढेल आणि भविष्यात श्वेता महाले यांचे राजकारण सेफ राहिले हेही एक राजकीय आडाखा बोंद्रे यांच्या प्रवेशामागे आहे.
वेळ आली तर दोन्ही जागा लढणार! पुणे पदवीधर अन् शिक्षकबाबत मंत्री गोरेंचं मोठं वक्तव्य
2029 च्या लोकसभेचे गणित ?
राहुल बेंद्रे यांच्या भाजप प्रवेशामागे 2029 च्या लोकसभा व विधानसभेचे गणित आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे खासदार असून, केंद्रात मंत्री आहे. या लोकसभेच्या मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद आहे. त्यामुळे भविष्यात हा लोकसभा मतदारसंघात भाजप आपल्याकडे खेचू शकतो आणि तिथून आमदार श्वेता महाले यांना रिंगणात उतरू शकतो आणि चिखली मतदारसंघातून राहुल बोंद्रे यांना दिला जाऊ शकतो, असे राजकीय गणित यामागे असल्याचे बोलले जात आहे.
