Rahul Gandhi Warning Modi Shah Gyanesh kumar : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या ‘वोट बचाव, देश बचाव’ महारॅलीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करतानाच त्यांना तुरुंगात जावे लागेल, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले. तसेच, ज्ञानेश कुमार यांच्यानंतर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधातही लढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
Video : ज्ञानेश कुमार यांना तुरुंगात जावं लागेल! इंडिया आघाडीच्या महारॅलीतून राहुल गांधींचा थेट वार
मिंटो रोड येथून सुरू झालेली इंडिया आघाडीची महारॅली रामलीला मैदानावर पोहोचली. यावेळी झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांवरून निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला लक्ष्य केले.
देशाला जो संदेश जायचा होता, तो गेला आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार यांना या मोर्चातून स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. या मोर्चातील आवाज हा फक्त नेत्यांचा आवाज नाही, तर तो देशाचा आवाज आहे. देशातील तरुणांचा आवाज आहे, शेतकऱ्यांचा आवाज आहे, मजुरांचा आवाज आहे. हा आवाज सांगतोय की, देशात लोकशाहीला संपवू देणार नाही आणि संविधान नष्ट होऊ देणार नाही. कोणीही संविधानापेक्षा मोठा नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
‘2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतचोरी झाली’
हरियाणा, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतचोरी झाली आहे. 2024 च्या निवडणुकीनंतर साडेतेरा कोटी मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. देशातील 15 टक्के मतदारांना वगळण्यात आले, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
भाजपने दुकाने जबरदस्तीने बंद केली’; रामलीला मैदानातील महामोर्चाआधी राहुल गांधींचा आरोप
कोणतीही शक्ती ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घेण्यापासून आम्हाला रोखू शकणार नाही. ज्ञानेश कुमारांना तुरुंगात जावे लागेल. ही सामान्य चोरी नाही, याला देशद्रोह म्हणतात. ज्ञानेश कुमार यांच्याशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नसते आणि अमित शाह गृहमंत्री झाले नसते, असेही राहुल गांधी म्हणाले.
‘अंबानी-अदानींचे कर्ज माफ होते, शेतकऱ्यांचे नाही’
आरएसएसने देशातील आपल्या अनेक संस्थांवर कब्जा केला आहे. शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळत नाही, तरुणांना रोजगार मिळत नाही. देशातील सर्व संपत्ती अंबानी आणि अदानी यांच्याकडे गेली आहे. त्यांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज माफ होते; मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही. असा भारत आपल्याला नको आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
ईडी आणि सीबीआय या देशातील जनतेच्या संस्था आहेत, मोदी-शाह यांच्या नाहीत. फक्त या दोन ते तीन लोकांचा देश आम्हाला नको आहे. देशातील प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक संस्था अदानींचीच होत चालली आहे, असा भारत आम्हाला नको आहे. हे सर्व चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले प्रकार आपल्याला थांबवायचे आहेत. या बदलाची सुरुवात ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यापासून करायची आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
‘ज्ञानेश कुमार यांच्यानंतर मोदी-शाह यांच्याविरोधात उभे राहणार’
नरेंद्र मोदी कुठेही जाऊ शकत नाहीत. त्यांना जरी जायचे असेल, तरी आम्ही त्यांना जाऊ देणार नाही. ज्ञानेश कुमार यांच्यानंतर आम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासमोर उभे राहू. त्यामुळे तुम्ही पळून जाण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्हा तिघांविरोधात कारवाई होणार म्हणजे होणारच, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.
या तिघांनी देशाच्या आत्म्यावर आणि संविधानावर आक्रमण केले आहे. प्रत्येक भारतीयाचा आवाज बुलंद झाला पाहिजे. तो ऐकू आला पाहिजे. शेवटच्या माणसाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे, हाच माझा धर्म आहे, असे ते म्हणाले.
आम्ही नरेंद्र मोदी, अमित शाह, ज्ञानेश कुमार आणि आरएसएस यांना मारणार नाही, त्यांना कापणार नाही. त्यांच्याशी प्रेमाने वागू; पण त्यांना संविधान नष्ट करू देणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
