Rahuri Assembly by election-राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Rahuri Assembly by election) सात उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे (BJP) अक्षय शिवाजीराव कर्डिले (Akshay Kardile) यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके, महाविकास आघाडीतील बंडखोर ठाकरे गटाचे रावसाहेब खेवरे व इतर तीन अपक्ष रिंगणात आहेत. हा मतदारसंघ 2009 ला अस्तित्वात आल्यानंतर एक अपवाद वगळता या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राहिलेले शिवाजीराव कर्डिले यांनीच बाजी मारलीय. यात तीन फॅक्टर महत्त्वाचे ठरले आहेत. ते तीन फॅक्टर कोणते आहेत ? अक्षय कर्डिलेंसाठी हे फॅक्टर कसे महत्त्वाचे राहिल हेच पाहुया……
2008 ला विधानसभा मतदारसंघाची पुर्नरचना झाली. तीन वेळेस नगर-नेवासा मतदारसंघातून निवडून आलेले शिवाजीराव कर्डिले यांना हक्काचा मतदारसंघ राहिला नव्हता. तर राहुरी तालुक्यातील काही भाग, नगर तालुक्यातील जेऊर महसूल मंडळ आणि पाथर्डी तालुक्यातील करंजी महसूल मंडळातील गावे मिळून राहुरी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. गोपीनाथराव मुंडे यांच्याशी सलोख्याचे संबंध असल्याने शिवाजीराव कर्डिले हे भाजपमध्ये दाखल झाले आणि 2009 च्या विधानसभेच्या अटीतटीच्या लढतीत ते विजयी झाले. त्यानंतर 2014 मध्येही पुन्हा ते विजयी झाले. या मतदारसंघात सलग दोनदा तिरंगी लढती झाल्या. त्याचा फायदा शिवाजीराव कर्डिले यांना झाला. पण 2019 ला प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिले यांना पराभूत केले. तेव्हा दुरुंगी लढत झाली होती. 2024 मध्ये शिवाजीराव कर्डिले यांनी बाजी मारली. राहुरी विधानसभा मतदारसंघात राहुरीतील सर्वाधिक मतदार आहेत. पाथर्डी आणि नगर तालुक्याचे मिळून एक लाखाच्या आसपास मतदार आहेत.
हिंदुत्वाचा मुद्दा
राहुरी तालुक्यात 2004 ला भाजपचे चंद्रशेखर कदम हे आमदार झाले होते. ते आरएसएसशी निगडीत आहेत. तसेच राहुरीत भाजपला मानणारा हिंदुत्ववादी मतदार आहे. राहुरी तालुक्यातील हा मतदार शिवाजीराव कर्डिले यांच्या मागे कायमच राहिलेला आहे.
मुंडे फॅक्टर
पाथर्डीतील करंजी भागातील अनेक गावांमध्ये गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे यांना मानणारा मतदार आहे. गोपीनाथ मुंडेंच्या शब्दावर शिवाजीराव कर्डिले पाथर्डीतील गावांमध्ये भरभरून मतदान होत होते. त्यानंतर मंत्री पंकजा मुंडेंमुळे कर्डिले यांना मतदान होत होते. मुंडे यांच्या सभा झाल्यानंतर येथील राजकीय वातावरण फिरत असे, त्याचा फायदा कर्डिले यांना होत.
स्वतः कर्डिले फॅक्टर
शिवाजीराव कर्डिले यांचा नगर तालुक्यातील गावांवर जोरदार राजकीय होल्ड होता. त्यामुळे जेऊर महसूल मंडळातील गावांमधून शिवाजीराव कर्डिले यांना 80 टक्क्यांहून अधिक मतदान होत होते. राहुरी तालुक्यात पिछाडीवर राहिल्यानंतरही कर्डिले हे पाथर्डी आणि नगर तालुक्यातील मतदारांच्या जोरावर विजयाचे गणित फिक्स करत होते. त्याचबरोबर कर्डिले हे तिन्ही तालुक्यात विकासकामे करत होते. लोकांचे प्रश्न सोडवत होते. त्यामुळे 2024 ला पुन्हा ते सर्वाधिक 35 हजारांनी मतांनी निवडून आले होते. परंतु अल्प आजाराने त्यांचा निधन झाल्याने येथे पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे.
आता अक्षय कर्डिले हे त्यांचा राजकीय वारसा पुढे चालविण्यासाठी भाजपकडून रिंगणात उतरलेले आहे. शिवाजीराव कर्डिलेंविरुद्ध सर्व निवडणुकीत तनपुरे कुटुंबातील उमेदवार रिंगणात असतं. पहिल्यांदा तनपुरे निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. त्यामुळे अक्षय कर्डिलेंसाठी ही निवडणूक सोपी झालेली आहे. तनपुरे हे रिंगणात नसणे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार सुजय विखे यांची ताकद, संग्राम जगताप यांचा हिंदुत्वाचा मुद्दा, भावनिक लाट यामुळे अक्षय कर्डिलेंसाठी ही सर्वात सोपी निवडणूक असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.
