शनी देवाचा कोप म्हणूनच तुम्ही पराभूत…राम शिंदे यांना भाजपमधूनच घरचा आहेर
सभापती राम शिंदे यांनी माजी खासदार यशवंतराव गडाख यांची भेट घेतल्यानंतर भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे यांनी नाराजी व्यक्त करीत संतापजनक पोस्ट शेअर केलीयं.
Rushikesh Shete On Ram Shinde : शिंगणापूर देवस्थान सेटलमेंट करुन गडाखांना दिलं, शनी देवाचा कोप म्हणून तुम्ही पराभूत झाले असल्याचं म्हणत भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे (Rushikesh Shete) यांनी सभापती राम शिंदे यांना घरचा आहेर दिला आहे. दरम्यान, जिल्हा बॅंक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम शिंदे यांनी माजी खासदार यशवंतराव गडाख यांची भेट घेतली. या भेटीवरुन भाजपचे अनेक कार्यकर्ते नाराज झाल्याचं सांगत शेटे यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे.
ऋषिकेश शेटे यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले, तुम्ही शंकर गडाखांकडे गेले तुमच्या वैयक्तिक फायद्यासाठी माझी इच्छा नसताना मला तुम्हाला विरोध करण्यास भाग पाडू नका. शंकर यशवंतराव गडाख या माणसाने नेवासा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांना उबाठा काळात मंत्री असताना भयानक त्रास दिला, गोळीबार केले, भाजपला सपोर्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे शेततळे फोडले, पाण्याच्या पाइपलाइन फोडल्या, शेतकऱ्याचे उत्पन्नाचे साधन असलेले ऊस पेटून दिले, ऊसाच्या खोडक्या केल्या, खोट्या एट्रोसिटी दाखल केल्या, कलम ३०७ दाखल करून शेतकरी जेलमध्ये पाठवले, त्यांचे प्रपंच संपवले.
तुम्ही शंकर गडाखांकडे गेले तुमच्या वैयक्तिक फायद्यासाठी ज्याने भाजपचे असंख्य कार्यकर्त्याला त्रास दिला, तुमची अशी गळाभेट घेणे कार्यकर्त्यांना आवडलेले नाही त्यांची तुमच्यावर प्रचंड नाराजी आहे. शिंगणापूर देवस्थानमध्ये हजारो कोटी भ्रष्टाचार कुणामुळे झाला खरे कारणीभूत तुम्ही आणि बाळासाहेब मुरकुटे आहात तुम्ही पालकमंत्री असताना शिंगणापूर देवस्थान गडाखांना सेटलमेंट करून दिलं ते कसे दिले? हे जनतेला सांगायला लाऊ नका, त्याचे सर्व प्रूफ आमच्याकडे आहेत आणि तुम्ही कितीही यांना भेटले तरी हे मतदान तुम्हाला करणार नाही हे लक्षात ठेवा.
आता हे तुम्हाला मतदान करण्याच्या बोलीवर तुमच्याकडून काहीतरी पाप धुण्याची बोली करणार. शंकर गडाख या व्यक्तीस भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न करू नये. एक लक्षात ठेवा, तुम्ही विधानसभेला पराभूत होणे सोपे नव्हते परंतु तुम्ही शनी देवस्थान 2017 – 18 ला सेटलमेंट करून विकले म्हणून तुम्हाला शनीने उत्तर दिले. गडाखांच्या आयुष्यात सर्व संकट येते त्याला कारण देखील शनिवार आणि शनिदेवाचा कोप आहे. हा तुम्ही तुमच्यावर घेऊ नका आणि हे सगळं बोलून मला त्रास होणार असेल तर संघर्ष आमच्या रक्तात आहे कारण मी खानदानी भाजपा कार्यकर्ता आहे.
भारतीय जनता पार्टी आणि पक्षासाठी आणि आमचे रक्त सांडले आहे. मात्र तुमच्या अशा सेटलमेंट वृत्तीमुळे, तुमच्या विरोधात भाजप कार्यकर्ते एकवटतील हे लक्षात घ्या अशा शब्दांत ऋषिकेश शेटे यांनी आपला राग व्यक्त केला आहे.