Raj Thackeray Garjana Morcha: मुंबईत आज ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात ‘गर्जना मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न आणता केवळ तिरंगा घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होते. विविध विरोधी पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्या राजीनाम्यासह महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रिया रद्द करावी आणि आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
‘ज्ञानेश कुमारच नाही, मोदी-शाहांनाही घरी जावं लागेल’, संजय राऊतांचा मोठा दावा
मोर्चादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी निवडणूक प्रक्रियेवरून सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीला ‘वोट चोरी’ कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच 2017-18 पासून आपण मतांच्या कथित गैरप्रकाराबाबत बोलत असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले, “देशात वातावरण तापलंय वोट चोरीमुळे. 2017-2018 पासून मी सांगतोय की वोटचोरी होत आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत संपुर्ण बहुमत भाजपा आणि शिंदेगटाला मिळालं. 2024 लोकसभा निवडणुकीत 40 ते 60 लाख मतदार वाढवले गेले. असा कोणता वायग्रा आहे, ज्याने एवढे मतदार वाढवले. मला सत्ताधाऱ्यांवर राग नाही, पण त्यांनी सत्ता कशी मिळवली याचा राग आहे. या देशातील मतदारांनी ठरवावं कोणाला मत द्यायचं, निवडणुक आयोगाने नाही.”
‘मनमानी कारभार सुरू आहे’
राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावरही जोरदार निशाणा साधला. “मनमानी कारभार सुरु आहे. एकाच उद्योगपतीला जंगलं द्यायची, जमीनी, विमान, पोर्ट देऊन टाकायची. सत्ताधाऱ्यांना एवढा माज येतो कुठून, हे येतं ते निवडणुक आयोग यांच्या पाठीशी उभं आहे म्हणून. या देशातल्या जनतेने कितीही ओरडलं, काहीही केलं तर आम्ही निवडून येऊ कारण निवडणूक आयोग आमच्या पाठीशी आहे. असं या सत्ताधाऱ्यांना वाटंत,” अशी टीका त्यांनी केली.
‘मला नमाज पठण करायचंय…’ विचारलं अन को-पायलटचा हल्ला; कॅप्टन स्मित मच्छारांनी सांगितला थरारक अनुभव
‘माझा राग उद्योगपतींवरही नाही’
उद्योगपतींच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “माझा राग उद्योगपत्यांवरही नाही. कॉंग्रेसच्या काळातही अनेक उद्योगपती मोठे झालेत. पण भाजपच्या काळात फक्त एकच उद्योगपती मोठा होताना दिसतो.” माध्यमे आणि न्यायव्यवस्थेबाबतही त्यांनी गंभीर आरोप केले. “सुप्रिम कोर्ट, हायकोर्ट, न्युज चॅनल यांना सत्ताधाऱ्यांनी ताब्यात घेऊन ठेवलंय. तुमच्या पर्यंत खरं पोहचूच द्यायचं नाही, असा यांचा डाव आहे” असे ते म्हणाले.
‘सत्ता येते त्याच दिवसापासून जायला सुरुवात होते’
“सत्ता ज्या दिवशी यायला सुरुवात होते. त्याच दिवसापासून सत्ता जायला सुरुवात होत. प्रश्न फक्त एवढाच असतो की, तुम्ही किती काळ ती पुढे ढकलताय. आज भाजपचं सरकार आहे. उद्या नसेल, दुसरा कोणता तरी पक्ष सत्तेत असेल आणि त्याने भाजपप्रमाणे सत्ता राबवली तर भाजप काय करेल,” असा सवाल राज ठाकरेंनी भाजपला केला.
तामिळनाडूत मोठी राजकीय घडामोड, थलपती विजय यांच्या टीव्हीकेचा ‘इंडिया’ आघाडीत प्रवेश
‘एसआयआर पूर्णपणे रद्द झाला पाहिजे’
निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी एसआयआर रद्द करण्याची मागणी केली. “आपण या देशाचा ढाचा ढासाळतोय याचही भान भाजपाला राहिलं नाही. बोगस मतदार वाढवायचे आणि बोगस मतदार याद्या तयार करायच्या आणि सत्ता मिळवायची असं किती काळ चालणार,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“आज मला दोन महत्वाचे विषय मांडायचेत. पहिला विषय महाराष्ट्रात जो एसआयआर झाला, तो संपुर्णपणे रद्द झाला पाहिजे,” असे राज ठाकरे म्हणाले.
यावेळी त्यांनी माजी केंद्रीय गृहसचिव आणि मोदी सरकारमधील माजी मंत्री आर. के. सिंह यांच्या एसआयआरबाबतच्या भूमिकेचा दाखला दिला. राज ठाकरेंनी त्यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत सांगितले की, एसआयआर ही प्रक्रिया अपवादात्मक परिस्थितीत विशिष्ट भागापुरती मर्यादित करता येते आणि संपूर्ण देशात एकाच वेळी एसआयआर करणे बेकायदेशीर असल्याचे आर. के. सिंह यांचे मत आहे.
यानंतर राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले, “यामुळे एसआयआर रद्द झाला पाहीजे आणि बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहीजेत.”
शेवटी राज ठाकरे म्हणाले, “कोणचीही सत्ता येवू द्या काही फरक पडत नाही. पण ती सत्ता योग्य मार्गानी यावी असे मला वाटतं.”
