‘ज्ञानेश कुमारच नाही, मोदी-शाहांनाही घरी जावं लागेल’, संजय राऊतांचा मोठा दावा
मोर्चापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगासह केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.
Sanjay Raut’s bold claim : मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काही वेळातच ‘गर्जना मोर्चा’ सुरू होणार आहे. मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालय असा या मोर्चाचा मार्ग असून, निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंसह विविध विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगासह केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करताना राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही गंभीर आरोप केले.
संजय राऊत यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावरही जोरदार टीका केली. दोन्ही निवडणूक आयुक्तांच्या कार्यकाळात झालेल्या निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या कार्यकाळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका रद्द करून नव्याने निवडणुका घेण्याची मागणी राऊत यांनी केली. त्यांच्या कार्यकाळामुळेच भाजपला निवडणुकांमध्ये फायदा झाल्याचा आरोपही त्यांनी केला. देशात काय सुरू आहे, याची जाणीव आता लहान मुलांनाही असल्याचे सांगत देशभरात आंदोलनं सुरू असल्याचा दावा राऊत यांनी केला. केवळ ज्ञानेश कुमार यांनाच नाही, तर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाही एक दिवस घरी जावे लागेल, असा मोठा दावा त्यांनी केला.
‘मला नमाज पठण करायचंय…’ विचारलं अन को-पायलटचा हल्ला; कॅप्टन स्मित मच्छारांनी सांगितला थरारक अनुभव
दरम्यान, महिला पत्रकारासोबत झालेल्या कथित गैरवर्तनाच्या घटनेवरूनही राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर प्रश्न उपस्थित करत ते कुठे आहेत, असा सवाल त्यांनी केला. तसेच देशभरातील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर येत्या 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीत मोठे आंदोलन होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. शुक्रवारी सीजेपीच्या आंदोलनादरम्यान 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याच्या मुद्द्यावरूनही संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. आंदोलनातील मृत्यूबाबत सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर आरोप केले जात असताना राऊत यांनी या प्रकरणाची जबाबदारी सरकारने घ्यावी, अशी मागणी केली.
आंदोलनात सहभागी नसलेल्या पूर्णेकर यांच्या मृत्यूचा संदर्भ देत त्यांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे या घटनेची जबाबदारी स्वीकारणार का, असा प्रश्नही राऊत यांनी केला. ठाण्यातील आगामी मोर्चावरूनही राऊत यांनी सरकारला लक्ष्य केले. शहरातील नागरिक भयमुक्त वातावरणासाठी सर्वपक्षीय नेत्यांसोबत रस्त्यावर उतरले असतील, तर ही सरकारसाठी, विशेषतः मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी लाजीरवाणी बाब असल्याचे ते म्हणाले.
ठाण्यातील गुंडगिरी आणि माफियाराजावरून सरकारवर टीका करताना राऊत यांनी सरकारमध्ये बसलेल्या लोकांनाच प्रतिष्ठा दिली जात असल्याचा आरोप केला. ठाणेकरांच्या भावनांचा आदर करण्याचे आवाहन करत त्यांनी आमदार संजय केळकर आणि गणेश नाईक यांनाही या मोर्चाचे नेतृत्व करण्याचे आवाहन केले आहे.