Rajasthan Panchayat Election Results: राजस्थानमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेसने शानदार कामगिरी करत सत्ताधारी भाजपला (BJP) जोरदार धक्का दिला आहे. ग्रामीण भागातील मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिल्याचा दावा पक्षाकडून करण्यात येत आहे. या निकालानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राजस्थानमधील जनतेचे आभार मानत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे, राजधानी जयपूरमध्येही काँग्रेसने भाजपला मागे टाकत मोठे यश मिळवले आहे.
खरचं कोणीतरी आठवण काढतं म्हणून उचकी लागते? की, यामागे आहे वेगळचं कारण…
राहुल गांधींचा भाजपवर निशाणा
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत राजस्थानमधील ग्रामीण जनतेचे आभार मानले. पंचायत निवडणुकीत लोकांनी काँग्रेसवर विश्वास दाखवला असून, त्यामुळे पक्षाची जबाबदारी आणखी वाढली आहे, असे त्यांनी म्हटले. भाजपची सत्ता असलेल्या राज्यातच मतदारांनी सत्ताधारी पक्षाला उत्तर दिले आहे. हा कौल केवळ भाजपसाठीच नाही, तर त्यांच्या ‘डबल इंजिन’ सरकारसाठीही संदेश असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.
राजस्थान के ग्रामीण भाइयों-बहनों का दिल से धन्यवाद। पंचायत चुनाव में आपने कांग्रेस पर जो भरोसा जताया है, वो अब हमारी ज़िम्मेदारी है।
ये जवाब BJP की अपनी सरकार वाले राज्य से आया है – सीधे “डबल इंजन” को।
BJP ने मनरेगा पर हमला किया, किसान को घाटे में डुबोया, पंचायतों के अधिकार छीने। महंगाई, बेरोज़गारी और पलायन ने गाँव सूने कर दिए।
गाँव सब देख रहा था, सह रहा था। अब उसने बोल दिया है।
ये सिर्फ़ राजस्थान का जनादेश नहीं – देश के हर गाँव की आवाज़ है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 20, 2026
भाजपने मनरेगावर हल्ला केला, शेतकऱ्यांचे नुकसान केले आणि पंचायतींचे अधिकार हिरावून घेतले, असा आरोपही त्यांनी केला. महागाई, बेरोजगारी आणि स्थलांतरामुळे गावांची अवस्था बिकट झाली आहे. गावातील जनता हे सर्व पाहत होती. त्यामुळे हा निकाल केवळ राजस्थानचा नसून देशातील प्रत्येक गावाचा आवाज असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.
पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसला मोठे यश
काँग्रेसचे माध्यमप्रमुख पवन खेरा यांनीही या निकालावरून भाजपला टोला लगावला आहे. राजस्थानमधील भाजपच्या लोकप्रियतेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोणी अभिनंदन केले का, असा सवाल त्यांनी एक्सवरील पोस्टमधून उपस्थित केला.
पवन खेरा यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, राजस्थानमधील पंचायत समित्यांच्या 4,958 जागांपैकी काँग्रेसने 2,463 जागांवर विजय मिळवला, तर भाजपला 1,512 जागा मिळाल्या. तसेच 457 पंचायत समित्यांपैकी काँग्रेसने 264 समित्यांवर, तर भाजपने 69 समित्यांवर विजय मिळवला आहे.
मुख्यमंत्री भजनलाल शर्मांकडे राजीनाम्याची मागणी
राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांनी या निकालावरून मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि त्यांच्या मंत्रिमंडळावर टीका केली आहे. ग्रामीण मतदारांनी सत्ताधारी पक्षाला नाकारले असून, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
जयपूरमध्ये भाजपला मोठा धक्का
या निवडणुकीत भाजपचा सर्वात मोठा धक्का राजधानी जयपूरमध्ये बसल्याचे चित्र आहे. जयपूर जिल्हा परिषदेच्या 57 जागांपैकी काँग्रेसने 41 जागांवर विजय मिळवला, तर भाजपला केवळ 12 जागांवर समाधान मानावे लागले. जयपूरमधील 22 पंचायत समित्यांपैकी काँग्रेसने 14 ठिकाणी बहुमत मिळवले, तर भाजपला केवळ 2 पंचायत समित्यांमध्ये बहुमत मिळाले.
भजनलाल शर्मांच्या बालेकिल्ल्यात हनुमान बेनीवाल यांची बाजी
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासाठी आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या सांगानेर मतदारसंघात हनुमान बेनीवाल यांच्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने (RLP) बहुमत मिळवले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातही भाजपला आव्हानाचा सामना करावा लागला आहे.
एकूणच, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमधील काँग्रेसच्या कामगिरीमुळे राजस्थानच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील या निकालांचा आगामी राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे आता लक्ष लागले आहे.
