Ram Purnekar Protest Over Pradip Purnekar Murder Case in Thane: ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर (Pradip Purnekar) यांच्या हत्येला 27 दिवस उलटूनही या प्रकरणातील कथित सूत्रधारांना अटक झालेली नसल्याने कुटुंबीयांचा संताप वाढला आहे. न्यायाच्या मागणीसाठी प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम (Ram Purnekar) पूर्णेकर यांनी मंगळवारी (27 ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( DCM Eknath Shinde) यांच्या ठाण्यातील ‘शुभ-दीप’ निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलन सुरू करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी वडिलांच्या आठवणीने राम पूर्णेकर यांना अश्रू अनावर झाले.
‘माझे वडील गेलेत सर’; पोलिसांसमोर राम पूर्णेकर भावुक
एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या देण्यासाठी राम पूर्णेकर पोहोचले होते. मात्र, वागळे इस्टेट पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत रिक्षातून पोलीस ठाण्यात नेले. यावेळी राम पूर्णेकर रिक्षात बसण्यास तयार नव्हते. पोलीस अधिकारी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. ‘राम, माझं ऐक, रिक्षात बस, माझ्यावर विश्वास ठेव,’ असं अधिकारी त्यांना सांगत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्यावर ‘माझे वडील गेलेत सर,’ असं म्हणत राम पूर्णेकर यांना रडू कोसळलं.
या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते केदार दिघे आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. राम पूर्णेकर यांच्या आईनेही पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना जाब विचारला. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अद्याप अटक का करण्यात आलेली नाही, असा सवाल कुटुंबीयांकडून उपस्थित करण्यात आला. दरम्यान, राम पूर्णेकर यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी नौपाडा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. संबंधितांना अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.
एकनाथ शिंदेंनी दिलं होतं कारवाईचं आश्वासन
काही दिवसांपूर्वी मंत्री प्रताप सरनाईक यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी फोनवरून एकनाथ शिंदे यांच्याशी कुटुंबीयांचं बोलणं करून दिलं. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असं आश्वासन शिंदे यांनी दिल्याचं सांगण्यात आलं होतं.
दिलेला शब्द पाळला! दिवाळीपूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 391 कोटींचा निधी मंजूर
मात्र, त्यानंतरही तपासाबाबत समाधानकारक कारवाई झालेली नसल्याची भावना पूर्णेकर कुटुंबीयांकडून व्यक्त होत आहे. अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावरील गोळीबाराच्या घटनेनंतर एकनाथ शिंदे त्याच्या भेटीसाठी गेले होते. त्यावरूनही राम पूर्णेकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. टायगर श्रॉफला भेटण्यासाठी वेळ मिळतो, पण ठाण्यात असूनही शिंदे आमच्या घरी आले नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.
मीनाक्षी शिंदे गुन्हे शाखेत दाखल
दरम्यान, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना ठाणे गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानुसार त्या मंगळवारी दुपारी 1 वाजता गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाल्या. यावेळी त्यांनी या प्रकरणावर अधिक भाष्य करणं टाळलं. ‘यापूर्वीही मी सांगितलं होतं की, चौकशीसाठी बोलावलं तर मी चौकशीला सामोरं जाईन. आता मला बोलावलं आहे, त्यामुळे मी आले आहे. पोलिसांना सहकार्य करेन,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.
शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारची मोठी तयारी; केंद्राकडं 40 हजार कोटींची मागणी
या प्रकरणात राम पूर्णेकर यांनी केलेल्या आंदोलनाच्या प्रयत्नामुळे तपास आणि अटकेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. उद्या, ठाण्यात प्रदीप पूर्णेकर यांना न्याय मिळावा या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात भाजपचे स्थानिक पदाधिकारीही सहभागी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
