Download App

“दिल्लीत जाऊन मला राजा व्हायचंय, दिल्लीची तिजोरी..”, महादेव जानकरांना भलताच कॉन्फिडन्स!

महाराष्ट्राच्या सुभेदारीत माझी लढाई नाही तर दिल्लीच्या राजासाठी आहे. राजा बनण्यासाठी आहे असे महादेव जानकर म्हणाले.

Mahadev Jankar : ‘माझं अंतिम लक्ष दिल्लीवर आहे. दिल्लीत राजा राहतो आणि महाराष्ट्रात सुभेदार राहतो. महाराष्ट्राच्या सुभेदारीत माझी लढाई नाही तर दिल्लीच्या राजासाठी आहे. राजा बनण्यासाठी. दिल्लीचा राजा हुकूम देतो तेव्हा राज्याचा सुभेदार काम करतो. त्यामुळे माझी अंतिम लढाई दिल्लीचीच आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचं अंतिम ठिकाण दिल्लीच आहे. माझं अंतिम लक्ष्य दिल्लीवर राज्य करण्याचंच आहे. दिल्लीत सर्वात मोठी तिजोरी आहे. तिची चावी आपल्याजवळ पाहिजे. दिल्लीची तिजोरी हाती आली तर आपल्याला सर्व समाजाचं हित करता येईल. म्हणूनच हा पक्ष मी स्थापन केलाय’, असा ठाम विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केला.

महादेव जानकर यांनी लेट्सअप मराठीशी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली. जानकर म्हणाले, ‘दिल्ली निवडणुक आता आम्ही लढवत आहोत. बिहारमध्ये सुद्धा लढवत आहोत. जिंकणार असे मी म्हणणार नाही पण आम्ही तिथे खातं उघडणार आहोत. आज माझा पक्ष संपला म्हणता मी त्यांना सांगू इच्छितो ज्यावेळी मी 2004 मध्ये पक्ष काढला तेव्हा एक आमदार होता. 2009 मध्ये सुद्धा आमदार होता. 2014 मध्येही होता. 2019 मध्येही आमदार आहे. महादेव जानकरचं खातं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानकर स्वतः च्या हिमतीवर जिंकून दाखवणार आहे. वन नेशन वन एज्युकेशन ही सिस्टीम घेऊन आम्ही देशभर फिरणार आहोत.’

“महायुतीने मदत केली, जनतेची कामं केली, पण मी भिकारीच”; जानकर नेमकं काय म्हणाले?

‘गुजरातमध्येही आमच्या पक्षाचे नगरसेवक आहेत. उत्तर प्रदेश, कर्नाटकात आमचं काम चांगलं चाललं आहे. त्यामुळे पक्ष कधीच संपत नसतो. आधी भाजपबरोबर युती होती. उद्या काँग्रेस बरोबरही होईल. आमची ताकद वाढली की काँग्रेसवालेही बोलावतील आम्ही वेलकम करू ना. विचारधारा वेगळी असेल पण सत्तेचं गणित आम्ही बसवू ना. त्यामुळे ह्यांनी (भाजप) आम्हाला सांगू नये. वीस पंचवीस वर्षांपूर्वी काँग्रेसला सुद्धा असेच वाटत होते. त्यामुळे ह्यांची काळजी करू नका ह्यांना (भाजप महायुती) पाडून आम्ही देखील विजयी होऊ शकतो हा मला आत्मविश्वास आहे.’

भाजपनंच ईव्हीएम सेट केलं

ईव्हीएम हॅक होऊ शकतं असा दावा तुम्ही केला होता याबद्दल काय सांगाल असे विचारले असता, ‘जोपर्यंत या देशातून ईव्हीएम जाणार नाही तोपर्यंत लोकशाही वाचणार नाही. ज्या देशात ईव्हीएमचा जन्म झाला होता त्याच देशातून नंतर या मशीन हटवण्यात आल्या होत्या. ज्यांनी सरकार आणलं (भाजप) त्यांनीच या मशीन सेट केल्या असा आमचा दावा आहे.’ भाजपने केलंय का? असे विचारताच ‘प्रश्नच नाही. सत्ता आणली आहे त्यांनी. लोकसभेच्या वेळी सेट झालं नाही पण विधानसभेच्या वेळी त्यांनी सेट केलं आहे हा आजही माझा दावा आहे’, असं बेधडक उत्तर जानकर यांनी दिलं.

‘अक्कलकोटमध्ये माझा स्वतः चा सुनील बंडगर नावाचा उमेदवार होता. त्याच स्वतः चं मतदान गेल्यानंतरही तेथे झिरो दाखवत होतं. जिथे मी पवार साहेबांच्या विरोधात उभा होतो तेव्हा 25 हजार 30 हजार अशी मतं पडायची तिथेच आज फक्त पाचशे मतं मिळतात. म्हणून मी अगदी खात्रीने सांगतो की त्यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा केला आहे हा राष्ट्रीय समाज पक्षाचा दावा आहे.’

‘लाडकी बहिण त्यांना थोडी पावली. वीज बिल माफ केलं त्याचाही त्यांना फायदा मिळाला आहे. पण ईव्हीएम मशीन देखील त्यांनी काही ठिकाणी सेट केले आहेत हे मी खात्रीने सांगतो. आणि जोपर्यंत ईव्हीएम जाणार नाही तोपर्यंत उपेक्षितांचे राज्य येणं अवघड आहे असं मला वाटतं.’

विधानसभा निवडणुकीत फटका बसला

भाजप लहान पक्ष संपवण्याचं काम करतो हा आरोप महाविकास आघाडीने केला तसा तुम्ही सुद्धा केला होता याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसला का? असे विचारल्यावर जानकर म्हणाले, ‘हो प्रश्नच नाही. भाजपकडे संघटन कौशल्य आहे. भाजप नेहमीच इलेक्शन मोडमध्ये राहणार पक्ष आहे. 2029 ची तयारी त्यांची आतापासूनच सुरू झाली आहे. पण आम्ही मंडळी काय करतो इलेक्शन आलं की महिनाभर आधी तयारी करतो. ते तसं करत नाही त्यांचं काम 365 दिवस सुरू असतं. आता हेच काम बाकीच्या पक्षांनी देखील करावं. त्या लेव्हलने आता आम्ही काम करतोय.’

महादेव जानकर यांचा पक्ष संपला का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. जानकर यांची पुढील रणनीती काय राहणार? यावर जानकर म्हणाले, ‘महादेव जानकरचा पक्ष कधीच संपणार नाही. कोणताही राजकीय पक्ष कधी संपत नाही. वाघ चार पावलं मागे सरतो अन् थेट दिल्लीच गाठतो त्यातला महादेव जानकर आहे. मी पाच वेळा लोकसभेला उभा राहिलो. पराभूत झालो तरी देखील मी नाराज नाही. मी एक दिवस नक्कीच जिंकणार. आम्ही कधीच संपणार नाही’, असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला.

 

follow us