Download App

Rohit Pawar : कंत्राटी भरतीचं खापर मविआवर म्हणजे स्वपक्षाच्या नाकर्तेपणावरच शिक्कामोर्तब; रोहित पवारांचा फडणवीसांना टोला

Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी कंत्राटी भारतीप्रकरणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे. कारण आज फडणवीसांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करत महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्यानंतर विरोधक आणि रोहीत पवार यांनी फडणवीसांना सुनावले आहे.

काय म्हणाले रोहीत पवार?

मा. फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब. कंत्राटी भरतीचं खापर आधीच्या सरकारवर फोडणं म्हणजे दिड वर्षांपासून सत्तेत असलेल्या स्वपक्षाच्या नाकर्तेपणावरच एकप्रकारे शिक्कामोर्तब केल्यासारखं आहे. प्रत्येक विभागाला कंत्राटी भरती अनिवार्य करण्याचं पाप कुणी केलं? तहसीलदार, शिक्षक, आरोग्यसेवक यांसारखी अनेक कायम पदं कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय कुणी घेतला?

कंत्राटी भरतीला व्यापक स्वरूप कुणी दिलं? #seriousness च्या नावाखाली #परीक्षा शुल्काच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची लूट कुणी सुरू केली? #पेपरफुटी विरोधात कडक कायदा करण्यास टाळाटाळ कोण करतंय? कंत्राटी भरतीचा निर्णय कुणाच्या काळात झाला, कुणाचं पाप आहे, कुणी माफी मागावी यात राज्याच्या युवा वर्गाला अजिबात स्वारस्य नाही. युवा वर्गाला केवळ शाश्वत नोकरी हवीय. त्यामुळं #अडीच_लाख_रिक्त पदांची #भरती कधी करणार यावर बोला!

पण तरीही तुम्ही हा विषय छेडलाच आहे तर एक सांगतो, कंत्राटी भरतीचा पहिला शासन निर्णय (GR) 2 जून 1998 रोजी झाला. त्यामुळं पाप… माफी याबाबत आपण स्वतःच अंतर्मुख होऊन चिंतन करण्याची गरज आहे. या सर्वांना जर तुमचंच सरकार जबाबदार असेल तर राज्यातल्या तमाम युवांची नाक घासून माफी अर्थातच तुम्हीच मागायला हवी!

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारने काढलेले कंत्राटी भरतीचे जीआर रद्द करत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. या निर्णयाची माहिती देताना त्यांनी याआधीच्या महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच कंत्राटी भरती करण्याचं पाप हे मविआचं आहे ते आम्ही आमच्या माथी घेणार नाही असे स्पष्ट सांगून टाकले.

कंत्राटी भरतीच्या संदर्भात पहिला निर्णय 2003 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात झाला आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना 2010 साली पहिला जीआर काढला त्यानंतर आणखी एक जीआर 6 हजार पदांच्या भरतीचा काढण्यात आला. यामध्ये शिक्षक भरतीचा जीआर काढण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मविआचं पाप आम्ही आमच्या माथी घेणार नाही. मागील सरकारने युवकांची माफी मागावी. युवकांची दिशाभूल केल्याप्रकरणी ठाकरे आणि पवारांनी युवकांची माफी मागावी.

Tags

follow us