Anish Damania Appointed As Honorary Advisor Of Mitra Organization : राज्यातील भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने लढा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या पती अनिश दमानिया यांची महाराष्ट्र सरकारच्या ‘इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ (मित्रा) या संस्थेत मानद सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे. शाश्वत विकास आणि धोरण आखणीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या या संस्थेत अनिश दमानियांची एन्ट्री झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
अंजली दमानिया यांनी (Anjali Damania) गेल्या काही वर्षांत विविध नेते आणि मंत्र्यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रकरणांवर आवाज उठवला आहे. त्यामुळे अनेकदा सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करणाऱ्या त्यांच्या प्रतिमेमुळे, त्यांच्या पतीची राज्य सरकारच्या थिंक टँकमध्ये (Mitra Organization) निवड झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विरोधकांकडून दमानिया यांच्यावर टीकेचे बाण सोडले जात (Rohit Pawar) आहेत.
महाराष्ट्र सरकारची think tank असलेल्या मित्रा (MITRA) च्या मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन..! एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणे काढून @anjali_damania ताई ‘सामाजिक’ क्षेत्रात योगदान देत आहेत आता अनिश जी यांचे ‘आर्थिक विकासाच्या’ क्षेत्रात सरकारला… pic.twitter.com/XXsS2DEYWB
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 15, 2025
या नियुक्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) नेते अन् प्रदेश सरचिटणीस रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून टोला लगावला. त्यांनी लिहिलं, महाराष्ट्र सरकारच्या थिंक टँक असलेल्या ‘मित्रा’वर अनिश दमानिया (Anish Damania) यांची मानद सल्लागारपदी नेमणूक झाल्याबद्दल शुभेच्छा. अंजली दमानिया भ्रष्टाचाराविरुद्ध झगडून सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत, तर अनिश दमानिया आर्थिक विकासाच्या दृष्टीने सरकारला मार्गदर्शन करतील. दमानिया कुटुंब सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात एकत्र योगदान देणार आहे, हे नक्कीच विशेष आहे. पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन.
रोहित पवारांच्या या वक्तव्याला अंजली दमानिया यांनी देखील सोशल मीडियावरून प्रत्युत्तर दिले. त्यांनी स्पष्ट केले की, मला रोहित पवारांची पोस्ट वाचून फारसं वाईट वाटलं नाही. अनिश हा त्याच्या ऑफिसमधून ‘एफआयसीसीआय’चा सभासद झालेला तिसरा व्यक्ती आहे. त्यामुळेच त्याला ‘मित्रा’मध्ये मानद सल्लागार म्हणून घेतलं आहे. या पदावर तो कोणतंही मानधन घेणार नाही. त्याचा राजकारणाशी किंवा सरकारशी काही संबंध नाही. माझ्यासारखंच त्यालाही देशासाठी योगदान द्यायचं आहे. आम्ही दोघांनीही ही माहिती खुलेपणाने समाजमाध्यमांवर जाहीर केली आहे. लपवण्यासारखं काहीच नाही, उलट मला त्याचा अभिमान आहे.