राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) नेत्या व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. 2024 च्या विधानसभेसाठी त्या खडकवासला या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केले आहे.
चाकणकर या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या एक फायब्रँड महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात. 2019 च्या विधानसभेवेळेसच मी अजित पवारांकडे खडकवासला मतदारसंघातून तिकीट मागितल्याचे चाकणकरांनी सांगितले. पण ऐनवेळी आमच्या महिला प्रदेशाध्यक्षा यांनी पक्ष बदलल्याने माझ्यावर ती जबाबदारी पडली. तसेच खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीकडून बरेच जण इच्छुक आहेत. पण जिथे स्पर्धा जास्त असते तिथेच काम करायला मजा येते, असे चाकणकरांनी सांगितले.
दरम्यान 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन दोडकेंचा पराभव केला होता. ही निवडणूक अत्यंच चुरशीची झाली होती. तसेच गेल्या काही दिवसांपासून रुपाली चाकणकर यांच्या भाजप प्रवेशाच्या देखील चर्चा होत आहेत. यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. विरोधकांना ही चर्चा करण्यात रस असेल. महिला आयोगाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री येणारच, त्यामुळे ही चर्चा होत असेल असे त्यांनी सांगितले. तसेच पहिल्यांदाच मुख्यमंत्री एका पक्षाचे व महिला आयोगाच्या अध्यक्षा दुसऱ्या पक्षाच्या असे झाले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.