Kolhapur Politics : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhtrapati) यांना मोठी अट घालण्यात आली आहे. संभाजीराजेंनी महाविकास आघाडीतील तीन प्रमुख घटक पक्षांपैकी एका पक्षात जाहीर प्रवेश करावा, त्यानंतरच त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी अट घालण्यात आली आहे. (Sambhaji Raje Chhatrapati is trying to get the nomination from Mahavikas Aghadi for Kolhapur Lok Sabha Constituency)
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजीराजे छत्रपती यांना सोबत घेण्यावर महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांमध्ये एकमत झाले आहे. छत्रपती उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, ज्योतिरादित्य सिंधिया, वसुंधराजे सिंधिया अशी देशातील अनेक राजघराणे भाजपसोबत जात असताना कोल्हापूरच्या राजघराण्याला सोबत घेत वेगळा संदेश देण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न आहे.
मात्र त्यासाठी संभाजीराजे यांना त्यांच्या स्वराज्य पक्षातून नाही तर तिन्ही घटक पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करण्याची अट घातली आहे. यावर आता ते काय निर्णय घेणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. पण आतापर्यंतची त्यांची एकूण राजकीय वाटचाल बघता ते हा प्रस्ताव स्वीकारण्याची शक्यता कमी आहे. कारण मराठा आरक्षणामुळे त्यांना मिळालेले वलय आणि मागील काही दिवसांपासून त्यांनी स्वराज्य संघटनेची केलेली बांधणी या माध्यमातून ते राजकारणात पुढे जात आहेत.
कोल्हापूर लोकसभेसाठी संभाजीराजे छत्रपती यांचे नाव चर्चेत आहे. एक तर स्वराज्य संघटनेकडून स्वबळावर किंवा स्वराज्य संघटनेकडून आणि महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने ते लोकसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे सांगितले जाते. संभाजीराजे यांनीही स्वतः आपली काँग्रेससोबत चर्चा सुरु असल्याचे सांगितले होते. नुकतेच स्वराज्य संघटनेचा भव्य मेळावा कोल्हापूरमध्ये पार पडला. या मेळाव्यात त्यांनी लोकसभेच्या आखाड्यात उतरावे, यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केला होता.
कोल्हापूर लोकसभेची जागा मिळविण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. मात्र ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? असा सवाल विचारला जात आहे. याआधी दीड वर्षांपूर्वी ते राज्यसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते. पण शिवसेनेने त्यांना पक्षात प्रवेश करण्याची अट घातली होती. पण ती अट संभाजीराजेंना मान्य नव्हत्या. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या प्रस्तावावर संभाजीराजे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.