ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut On Eknath Shinde ) हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोग ( Election Commission ) व भाजपवर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगाने काल शिवसेना पक्ष व धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. यावरुन राऊत यांनी शिंदे गट व निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. आम्ही अजिबात खचलेलो नाही, लोक आमच्या बरोबर आहेत. बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना, अशी सोडून गेलेल्यांची अवस्था आहे, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.
यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. पाळीव कुत्र्याने भाकरी पळवल्याने मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही, अशा शब्दात त्यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच रावण हा धनुष्यबाण पेलू शकणार नाही, ते त्याच्या छातीवरच पडणार असा टोला त्यांनी शिंदेंना लगावला. बोलताना राऊत यांनी भाजप व केंद्र सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. या देशातील पंतप्रधान कार्यालय ते राष्ट्रपती कार्यालाय हे सर्व शिवसेना संपवण्यासाठी वापरले आहे. एवढे हे शिवसेनेला घाबरले आहेत. सुड भावनेने त्यांनी हे काम केले असून या देशात लोकशाहीच्या नावाने चाललेला हा राजकीय हिंसाचार आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
दरम्यान जे शिवसेना सोडून गेले ते परत कधीही निवडूण येणार नाही. त्यांच्याकडे कोणतेही चिन्ह असू द्या. कालच्या निर्णयामुळे जनतेमध्ये प्रचंड राग आहे. ते जर मर्द होते तर त्यांनी स्वत: चा पक्ष काढायला पाहिजे होत. त्यामुळे राज्यात पश्चिम बंगालप्रमाणे निकाल लागण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी देखील मोदी व शाह यांनी बंगालच्या अस्मितेशी खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ही लढाई मिंधे गट विरुद्ध शिवसेना नसून शिवसेना विरुद्ध महाशक्ती अशी आहे, असे राऊत म्हणाले आहेत.