Download App

Sanjay Raut : वारीसे यांच्या हत्येच्या वेळी सीसीटीव्ही बंद कसे, राऊतांचा सवाल

शिवसेना ठाकरे गटाचे ( Shivsena Thackarey Camp )  खासदार संजय राऊत ( Sanjay Raut )  हे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे देखील होते. पत्रकार शशीकांत वारीसे ( Shashikan Warise )  यांची हत्या झाल्याचा आरोप राऊतांनी यावेळी केला. रिफायनरीला विरोध करत असल्याने वारीसे यांची हत्या करण्यात आली, असे राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकण दौऱ्यावर आहेत. ते देखील वारीसे यांच्या कुटूंबियांची भेट घेणार आहेत. त्याआधीच राऊत यांनी वारीसे यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. वारीसे यांच्या हत्येच्या वेळी नेमके सीसीटीव्ही बंद कसे, असा प्रश्न राऊतांनी विचारला आहे. वारीसे यांच्या गाडीला ज्याठिकाणी धडक देण्यात आली, त्याआजूबाजूचे पेट्रोल पंप व सीसीटीव्ही एकाच वेळी कसे काय बंद होते, असे विचारत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी पंढरीनाथ आंबेरकर या ड्रायव्हरवर वारीसे यांची हत्या घडून आणल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान शशीकांत वारीसे हे रिफायनरीच्या विरोधात होते, म्हणून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. या कोकणाने महाराष्ट्राला लोकमान्य टिळक, बाळशास्त्री जांभेकर,  असे पत्रकार दिले आहेत. त्याच मातीमध्ये एका तरुण पत्रकाराची हत्या होते, हे धक्कादायक आहे, अशी टीका राऊतांनी केली.

शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपये राज्य सरकारने द्यावेत अशी आमची मागणी आहे. त्यांची पत्नी, मुलगा, आई यांचा आक्रोश सरकारने ऐकावा, असे राऊत म्हणाले आहेत. वारीसे यांच्या हत्येमागे जे कोणी आहे, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राऊतांनी केली आहे.

Tags

follow us