मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. येथे ते वंदे भारत रेल्वेला (Vande Bharat Train) हिरवा झेंडा दाखवतील. मात्र, त्यांच्या या दौऱ्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदींच्या दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. मोदी नेमके कशासाठी मुंबई दौऱ्यावर येत आहेत, याचेही स्पष्ट उत्तर त्यांनी दिले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
‘मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तारीख तारीख ठरत नाही, तोपर्यंत नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा मुक्काम मुंबईत (Mumbai) राहील यात शंका नाही. राज्यातील भाजप (BJP) व मिंधे गटाचे लोक मुंबई महापालिकेची निवडणूक (Mumbai Municipal Election) जिंकू शकत नाही. अर्थात मोदी जरी आले किंवा अख्खा देश जरी येथे लावला जसा इतर राज्यांत लावता तसा, तरी देखील मुंबई महापालिका शिवसेनाच जिंकेल याची पूर्ण खात्री असल्यामुळेच मोदींचा पत्ता सारखा टाकला जात आहे.’ ‘संसदेत अनेक महत्वाच्या घडामोडी घडत असताना मोदी मुंबईत येतात. मोदींना मुंबई महापालिका जिंकायची आहे, हे मिंधे गटाचे स्पष्ट अपयश आहे.’
अधिवेशनापूर्वी मोठी उलथापालथ होणार असून ठाकरे गट वगळता इतर पक्षातील १० ते १५ आमदार फुटतील असा खळबळजनक दावा आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. मात्र यावेळी त्यांनी शिंदे गाटातील २० ते २५ आमदार इकडे तिकडे झाले तरी सरकार मजबूतीने पूर्ण काळ टिकेल असाही दावाही केला आहे. पक्षप्रवेश आणि न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांमुळे मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख नेहमी पुढे जात आहे. मात्र पुढील १५ दिवसांत अधिवेशनाच्या आधी मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होईल असे सूचक वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केले होते. त्यावर राऊत म्हणाले, की ‘स्वतः बच्चू कडू प्रवेश करत आहेत का हे आधी स्पष्ट करावे. माझ्या माहितीनुसार भाजपाचे २० ते २५ आमदार प्रवेश करणार आहेत. त्यामुळे त्यांची माहिती योग्यच आहे.’
अदानींमागे कोणती शक्ती, मोदींनी सांगावे
‘राहुल गांधी यांनी अत्यंत सोपे प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तरे मोदी यांनी का नाही दिली. अदानींच्या मागे कोणती शक्ती आहे हे मोदींनी सांगावे. माझी ही मागणी आहे की जॉईंट पार्लमेंट कमिटीकडून अदानी प्रकरणाची चौकशी व्हावी.’ महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरला या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या वक्तव्यावर मात्र त्यांनी काही सांगण्याचे टाळले.