‘सांगली आणि शिवसेना’ हे समीकरण पूर्वीपासूनच कधी जमलं नाही. शिवसेनेनं (Shivsena) इथं निवडणुका लढवल्याच नाहीत असं नाही. अगदी स्थापनेपासून अलिकडे लोकसभेपर्यंत इथे विविध प्रयोग झाले. त्यात अगदीच किरकोळच प्रयत्न यशस्वी झाले. पण बहुतांश ठिकाणी सेनेला अपयश आले. शिवसेनेचा जिल्ह्यातील एकमेव यशस्वी प्रयोग ठरला तो खानापूर-आटपाडीच्या अनिल बाबर (Anil Babar) यांचा.
आघाडीमध्ये खानापूर मतदारसंघ काँग्रेसकडे होता आणि बाबर राष्ट्रवादीत (NCP) होते. सदाशिवराव पाटील (Sadashivrao Patil) यांच्यामुळे काँग्रेस ही जागा सोडण्याची शक्यताच नव्हती. मग बंडखोरीचे राजकारण किती दिवस करणार? 2014 ला भाजप – शिवसेना महायुतीचे वारे वाहू लागले होते. युतीत मतदार संघ शिवसेनेकडे होता. जिल्ह्यात आणि मतदारसंघात सेनेची ताकद नसतानाही बाबर यांनी रिस्क घेतली. ते सेनेत गेले. विधानसभेला युती तुटली. पण बाबर यांनी लढत दिली, ताकद लावली आणि जिल्ह्यातील शिवसेनेचे पहिले आमदार झाले. त्यांनी सलग दोनवेळा ठाकरेंच्या नेतृत्वात विजय मिळवला. शिवसेनेतील बंडानंतर बाबर यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली. दुर्देवाने काही दिवसांपूर्वीच बाबर यांचे निधन झाले आहे.
आता बाबर यांचा वारसा त्यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर पुढे चालवत आहेत. त्यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. पण त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नक्कीच नाही. याचे कारण इथे विरोधक तर प्रबळ आहेतच. याशिवाय त्यांच्यापुढे मित्रपक्षातूनच कडवे आव्हान आहे. इथे त्यांना दगा फटक्याचीही भीती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असो वा भाजप असो. दोन्ही पक्षांमधून सुहास बाबर यांच्यासाठी स्पर्धक आहेत. त्यामुळे यंदाची खानापूर मतदारसंघातील निवडणूक गाजणार हे नक्की आहे… (Sanjay Vibhute of Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) be the candidate against Suhas Babar of Shiv Sena in Khanapur-Atpadi assembly constituency)
सांगली जिल्ह्यातील आज घडीचा सगळ्यात मोठा मतदारसंघ म्हणजे खानापूर. तासगाव तालुक्यातील निंबळकपासून आटपाडी तालुक्यातील शेवटचे गाव विभुतवाडी आणि खानापूर तालुक्यातील हिंगणगादे ते तळेवाडी असा हा किमान 100 किलोमीटर विस्तारलेला हा मतदारसंघ आहे. तासगाव तालुक्यातील विसापूर मंडळातील 21 गावांचा या मतदारसंघात समावेश आहे.
मगाशी म्हंटल्याप्रमाणे, या मतदारसंघात 2014 पर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा सहयोगी अपक्षच आमदार निवडून येत होते. 1990 पर्यंत संपतनाना माने, शहाजीबापू साळुंखे, हणमंतराव पाटील आणि अनिल बाबर या चार आमदारांनी काँग्रेसच्या चिन्हावर विजय मिळविला. 1995 मध्ये आटपाडी तालुक्यातील राजेंद्र देशमुख यांनी अपक्ष मैदान मारले. सांगली जिल्ह्यातून त्यावेळी पाच अपक्ष विजयी झाले होते. त्या सगळ्यांनी युती सरकारला पाठिंबा दिला होता. याशिवाय मतदारसंघातील पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावर हणमंतराव पाटील यांचे पुत्र सदाशिवराव पाटील यांनीही तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी अनिल बाबर राष्ट्रवादीत गेले. तर राजेंद्र देशमुख यांनी नरमाईची भूमिका घेत माघार घेतली आणि सदाशिव पाटील तटस्थ राहिले. त्यामुळे काँग्रेसचे रामराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे बाबर अशी लढत झाली. त्यात बाबर यांना 52 हजार मते तर रामरावदादांना 25 हजार मते मिळाली. ही एकमेव निवडणूक बाबर अगदी सहज जिंकले. 2004 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीकडून अनिल बाबर विरुद्ध अपक्ष सदाशिव पाटील यांच्यात सामना रंगला. त्यात पाटील यांनी बाजी मारली. निवडून आल्यावर त्यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले.
2009 मध्ये पाटील यांनी काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश केला होता. तर बाबर यांनी अपक्ष अर्ज भरला. यात पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा बाजी मारली. 2014 मध्ये अनिल बाबर यांनी सततच्या बंडखोरीच्या राजकारणाला वैतागून शिवसेनेत प्रवेश केला. खरंतर त्यांच्यासाठी ही रिस्कच होती. कारण 2009 मध्ये या मतदारसंघात शिवसेनेला मिळालेली मते होती अवघी दोन हजार 745. पण 2014 मध्ये बाबर विजयी झाले तेव्हा त्यांना मते मिळाली होती 72 हजार 849. या निवडणुकीत काँग्रेसच्या मोहन कदम यांच्या गटानेही बाबर यांना पडद्यामागून मदत केली होती. सदाशिव पाटील काँग्रेसच्याच एका गटामुळे पराभूत झाले. 2019 मध्येही बाबर विरुद्ध पाटील असाच सामना रंगला. पण पुन्हा बाबर यांनीच गुलाल उधळला.
2019 नंतर आज 2024 पर्यंत या मतदारसंघातील राजकारण कमालीचे बदलले आहे. कदम-पाटील या काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाला तिलांजली देत सदाशिव पाटील यांनी राष्ट्रवादीशी दोस्ताना साधला. भाजपनेही गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेवर आमदार केले. 2022 मध्ये अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी घरोबा केला. पुढे राष्ट्रवादीतील बंडानंतर विटा नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सदाशिवराव पाटील यांचे पुत्र वैभव पाटील यांनी अजित पवार यांची साथ दिली आहे. आज घडीला आटपाडी तालुक्यातील माजी आमदार राजेंद्र देशमुख आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख हेही महायुतीमध्येच आहेत. त्यामुळे महायुतीकडे नेत्यांची तगडी फळी आहे.
पण हेच राजकारण आता धोकादायक बनले आहे. ज्याचा आमदार त्याची जागा या न्यायाने ही जागा शिवसेनेलाच सुटणार हे स्पष्ट आहे. ही स्पष्टता लक्षात घेत इथून अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर शिवसेनेकडून इच्छुक आहेत. जतमध्ये विरोध झाल्यानंतर भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनीही त्यांचा मोर्चा याच मतदारसंघाकडे वळविला आहे. बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्यासाठी ते उमेदवारी मागत आहेत. तर वैभव पाटील हेही अजित पवार गटाकडून तयारी करत आहेत. त्यामुळे एकाला उमेदवारी दिल्यास इतर दोघे नाराज होण्याची चिन्हे आहेत. त्यातून एकमेकांना पाडापाडीचे राजकारण बघायला मिळू शकते. स्थानिक पत्रकारांच्या अंदाजानुसार, बाबर यांना उमेदवारी मिळाल्यास पाटील आणि पडळकर हे त्यांना मदत करण्याची शक्यता कमी आहे.
महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटू शकते. या पक्षाकडून लोकसभेची निवडून पराभूत झालेले चंद्रहार पाटील उमेदवारी मागत आहेत. याशिवाय जिल्हाध्यक्ष संजय विभुते हेही इच्छुक आहेत. संधी मिळाल्यास अजित पवार गटाचे वैभव पाटील हेही मशाल हाती घेऊ शकतात. मध्यंतरी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचीही बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बाबासाहेब मुळीक, रावसाहेब पाटील हे नेते उमेदवारीची मागणी करु शकतात. मागील काही दिवसांपासून पलूस-कडेगावच्या कदम घराण्यातील जितेश कदम हेही काँग्रेसकडून तयारी करत आहेत. पण त्याचा अद्याप संपूर्ण मतदारसंघात प्रभाव पडलेला दिसून येत नाही.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघात एक तिसरी राजकीय शक्ती उदयास आली आहे. या गटात बाबर आणि पाटील या दोन्ही गटांचे कार्यकर्ते आहेत. खानापूर-आटपाडी विधानसभेतून विशाल पाटील यांना 16 हजार 654 मताधिक्य देण्यात या तिसऱ्या गटाचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे उद्याच्या विधानसभा निवडणुकीत या पाटील गटाची भूमिकाही निर्णायक राहणार आहे.
मतदारसंघाचा एकूणच राजकीय इतिहास आणि रचना पाहिली तर राजकीय पक्षांपेक्षा स्थानिक नेत्यांमधील गट-तट प्रबळ आहेत, त्यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे. कुठलेही दोन किंवा अधिक गट एकत्र आल्यास यशाचे पारडे त्यांच्या बाजूने झुकू शकते. सद्यस्थितीमध्ये विटा शहरात वैभव पाटील यांना मानणारा गट आहे. तर खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात बाबर यांना मानणारा वर्ग आहे. त्यामुळे बाबर आणि पाटील या दोन्ही गटांना आघाडी घ्यायची असल्यास आटपाडीचे सहकार्य आवश्यक ठरते. आटपाडी तालुक्यात माजी आमदार राजेंद्र देशमुख आणि तानाजी पाटील यांचा गट सक्रिय आहे. या दोन्ही गटांशी आघाडी साधण्याचा प्रयत्न बाबर आणि पाटील गटाकडून सुरु आहे.
गतवेळी देशमुख यांनी आपले योगदान बाबर यांच्या पारड्यात टाकले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी माणगंगा साखर कारखाना निवडणूक आणि जिल्हा बँक निवडणूक यात बाबर गटाचे सहकार्य मिळाले नसल्याचा देशमुख गटाचा आक्षेप आहे. त्यामुळे त्यांचे समर्थन बाबर यांना मिळणार का? देशमुख यांची नाराजी कशी दूर करणार हा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीत बाबर गटाने केलेल्या मदतीचा पैरा फेडण्यासाठी विशाल पाटील यांनी त्यांना समर्थन दिले आहे. जाहीर व्यासपीठावरच सुहास बाबर यांना पाठिंबा जाहीर केला. आता तानाजी पाटील हेही त्यांनाच समर्थन देणार का? वैभव पाटील काय करणार? चंद्रहार पाटील उमेदवारी मिळवणार का? शरद पवार यांच्या गटाने दावा सांगितल्यास ठाकरे काय करणार? अशा अनेक प्रश्नाची उत्तरे अद्यापही बाकी आहेत.