पुढील वेळेस संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्षनेतेपद घ्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना चिमटा
चहापानाच्या कार्यक्रमानंतर महायुतीकडून पत्रकार परिषद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री बऱ्याच महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य.
Press conference of CM Devendra Fadnavis and DCM Eknath Shinde : उद्यापासून विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या अनुषंगाने आज चहापानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. राज्यातील बऱ्याच गंभीर प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. त्याचप्रमाणे दोन्ही सभागृहात वर्ष उलटूनही विरोधीपक्ष नेतेपद अजून दिलेलं नाही. कुठेतरी विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. आता या सगळ्या प्रश्नांना महायुती सरकारकडून उत्तर देण्यात आलं आहे. चहापानाच्या कार्यक्रमानंतर महायुतीकडून पत्रकार परिषद घेण्यात आली.
या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(DCM Eknath shinde) यांनी बऱ्याच महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले, की आम्ही जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारी माणसं आहोत. आमच्या दुसऱ्या इनिंगला 1 वर्ष पूर्ण झालं. विरोधकांनी चर्चा घडवली पाहिजे. मात्र विरोधकांना जनतेच्या प्रश्नांत कोणताही रस नाही. आम्ही विरोधी पक्षाला कमी लेखत नाही. तर उलट विरोधी पक्ष हा संख्येने कमी असला तरी आम्ही त्यांना गांभीर्याने घेऊ.
Video : अधिवेशन किती काळ चालणार अन् विरोधी पक्षनेता कधी नेमणार?, विरोधकांना फडणीसांचे थेट उत्तर
नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीत आम्ही फिरत होतो. मात्र सगळ्या निवडणूक प्रक्रियेत महाविकास आघाडीचे नेते कुठे दिसले नाही. तसेच या निवडणुकीत महायुतीला 70 ते 75 टक्के यश मिळेल असं देखील यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान विरोधी पक्षनेतेपद देत नाहीत तर उपमुख्यमंत्री पद रद्द करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी केली होती. त्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या वेळी देखील उपमुख्यमंत्री पद होतं. तसेच पुढील वेळेस संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्षनेतेपद घ्या, मात्र याबाबतचा सर्व अधिकार अध्यक्षांचाच. अधिवेशनात लोकांचे प्रश्न मांडा, फक्त विरोधी पक्षनेतेपद द्या यासाठी लढा नका देऊ. त्याचप्रमाणे आरोप, टीका करायची असेल तर अधिवेशनात पूर्ण वेळ द्या. असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावलाय.
