Satara District Bank Election: सातारा जिल्हा बँकेच्या सत्तासंघर्षात नवा ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदाच्या निवडीला अवघे काही तास उरले असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या बड्या नेत्यांची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपला बाजूला ठेवून राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रितपणे जिल्हा बँकेची सत्ता ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सोलापूर बँकेत भाजपचा दबदबा! 10 जागा बिनविरोध, राजन पाटलांची दोन्ही मुले संचालक
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवड आज (18 नोव्हेंबर) सकाळी 11:30 वाजता होणार आहे. त्याआधी झालेल्या या राजकीय बैठकीला पालकमंत्री शंभूराज देसाई, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार नितीन पाटील आणि बँकेचे संचालक संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेचा नेमका तपशील समोर आलेला नसला, तरी अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
भाजपला बाजूला ठेवून नवे समीकरण?
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची एकत्रित बैठक झाल्याने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती आखली जात आहे का, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. या दोन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केल्यास साताऱ्यातील महायुतीच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होऊ शकतात. त्यामुळे भाजप नेत्यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
शिवेंद्रसिंहराजे आणि जयकुमार गोरेंची भूमिका महत्त्वाची
या सत्तासंघर्षात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांची भूमिका निर्णायक ठरू शकते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या हालचालींनंतर भाजप कोणती रणनीती आखणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या भूमिकेकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँकेत गुलाबराव पाटलांचा दबदबा; सेनेच्या सहा जागा बिनविरोध; भाजपला किती जागा ?
मुंबईतून कोणता निर्णय होणार?
साताऱ्यातील या घडामोडींचे पडसाद मुंबईतही उमटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून जिल्हा बँकेच्या सत्तेबाबत काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, आजच्या अध्यक्षपदाच्या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार की भाजपसह सर्व पक्षांमध्ये सहमती घडवून आणली जाणार, याचा निर्णय होईल. त्यामुळे सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवड केवळ बँकेपुरती मर्यादित न राहता जिल्ह्याच्या राजकारणासाठीही महत्त्वाची ठरणार आहे.
