नाशिक : “मला उमेदवारी मिळू नये, बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले गेले. मला काँग्रेसमधून बाहेर काढण्यासाठीचा हा डाव होता” असा आरोप नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी केला आहे. विधानपरिषद निवडणुकीत जो गोंधळ झाला. त्यावर आज शेवटी सत्यजित तांबे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सगळ्या आरोपांवर उत्तर दिले. यावेळी त्यांनी विधानपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या घडामोडींचा उल्लेख केला.
यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीकडून दोन वेळा चुकीचे एबी फॉर्म आल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी त्यांनी सांगितलं की ९ जानेवारीला एबी फॉर्मसाठी आम्ही प्रदेश कार्यालयाला संपर्क केला. तो फॉर्म नागपूर मधून घ्यायला सांगितला, त्यानुसार १० तारखेला माझा माणूस नागपूरला पोहोचला. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत तो बसून राहिला. त्यावेळी पक्षाकडून दोन एबी फॉर्म आले.
विधान परिषदेचे एबी फॉर्म हे महत्वाचं डॉक्युमेंट असतं त्यामुळे ते सीलबंद होते. 11 तारखेला सकाळी माणूस पोहोचला. फॉर्म भरायला सुरुवात केली. पाकिट फोडलं तेव्हा चुकीचे एबी फॉर्म पाठवल्याचं समोर आलं. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे ते फॉर्म नव्हते. एक औरंगाबादचा आणि दुसरा नागपूर शिक्षक मतदार संघाचा फॉर्म होता.
एबी फॉर्मसारखा महत्त्वाच्या डॉक्युमेंटबद्दल प्रदेश कार्यालयान अशी चूक का करावी ? असा प्रश्न सत्यजित तांबे यांनी केला.
त्यांनतर प्रदेश कार्यालयाकडून दुसऱ्यांदा फॉर्म मागितला त्यावेळी १२ तारखेला दुपारी दीड वाजता आलेल्या एबी फॉर्मवर डॉ. सुधीर तांबे यांचं नाव होतं. पर्यायी उमेदवाराचं नावाच्या ठिकाणी नील होतं. यावर शेवटी सत्यजित तांबे म्हणाले की मला भाजपकडून निवडणूक लढायची होती तर हे एबी फॉर्म चुकीचे आहेत, हे कार्यालयाला कळवलच नसतं.