Download App

नाशिकमध्ये सत्यजित तांबेंविरुद्ध शुभांगी पाटील लढत, भाजपकडून तांबेंना मैदान मोकळे!

नाशिकः राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप समर्थक धनराज विसपुते आणि धनंजय जाधव यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे, शुभांगी पाटील व सुभाष जंगले यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

ठाकरे गटाने पाठिंबा दिलेल्या शुंभागी पाटील यांनी अखेर तीन वाजेपर्यंत आपला अर्ज मागे घेतलाच नाही. मात्र भाजपचे समर्थक धनराज विसपुते आणि धनंजय जाधव यांनी माघार घेतली आहे. या मतदारसंघात भाजपने आपला अधिकृत उमेदवार तर दिलाच नाही, तर भाजप समर्थकांना उमेदवारी अर्ज माघार घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे भाजपकडून तांबेसाठी मैदान मोकळे झाले आहे.

यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे, शुभांगी पाटील व सुभाष जंगले यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. इतरही अपक्ष उमेदवार असले तरी या तीन उमेदवारांमध्येच लढत होणार आहे.

आज सकाळपासून शुभांगी पाटील नॉट रिचेबल होत्या. शुभांगी पाटील यांनी उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा, यासाठी भाजपा प्रयत्नशील असल्याची चर्चा होती. त्यामुळे शुभांगी पाटील उमेदवारी अर्ज मागे घेतील, अशीही अफवा पसरली होती.

परंतु, ही शक्यता फोल ठरली. तर दुसरीकडे शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याऐवजी सुभाष जंगले यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केली होता. मात्र याबाबत ठाकरे गटाकडून अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुले सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यामध्ये लढत होईल.

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 6 उमेदवारांनी माघार घेतली असून 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये अमोल खाडे, डॉ.सुधीर सुरेश तांबे, दादासाहेब पवार, धनंजय जाधव, राजेंद्र निकम, धनराज विसपुते या सहा उमेदवारांनी पदवीधर मतदार संघ निवणुकीतून माघार घेतली आहे.

रतन बनसोडे – वंचित बहुजन आघाडी नाशिक, सुरेश पवार – नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी नाशिक, अनिल तेजा- अपक्ष, अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर – अपक्ष धुळे, अविनाश माळी – अपक्ष नंदूरबार, इरफान असहाक – अपक्ष मालेगाव, ईश्वर पाटील – अपक्ष धुळे, बाळासाहेब घोरपडे – अपक्ष नाशिक, ॲड. जुबेर शेख अपक्ष धुळे, ॲड.सुभाष जंगले – अपक्ष श्रीरामपूर, सत्यजित तांबे – अपक्ष संगमनेर, नितीन सरोदे – अपक्ष नाशिक, पोपट बनकर – अपक्ष अहमदनगर, शुभांगी पाटील – अपक्ष धुळे, सुभाष चिंधे – अपक्ष अहमदनगर, संजय माळी – अपक्ष जळगाव असे एकूण 16 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

Tags

follow us