नागपूर : काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. सध्या राज्यात पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांचे वारे फिरत आहे. तसेच नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघात शेवटच्या क्षणी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देणारे महाराष्ट्र् प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे (Satyjeet Tambe) यांनी अर्ज दाखल केला आहे, त्यामुळं काँग्रेसमध्ये (Congress) समन्वय नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, राज्यात सत्यजीत तांबेंनी केलेली बंडखोरी, तसेच हा घोळ होण्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) जबाबदार असल्याचं नागपुरातील काँग्रेस नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh ) यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्र पाठवून राज्यातील सावळा गोंधळ याचा आढावा मांडणारं पत्र लिहिले आहे. तसेच या पत्रातून नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिकच्या जागेसाठी काँग्रेसनं सत्यजीत तांबे यांचे वडील आ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र अखेरच्या क्षणी सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र त्याच वेळी सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या शिस्तपालन समितीनं सत्यजित तांबे यांच्या निलंबनाची शिफारस प्रदेश काँग्रेसकडे केली आहे. तर अर्ज दाखल केला नाही म्हणून सुधीर तांबेवर आधीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत त्यांच्यावरही कारवाई होईल असे मानण्यात येतेय.
सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यासाठी काँग्रेसला दोष देण्यात काही अर्थ नाही. पण नाशिक पदवीधरची निवडणूक बिनविरोध होणार नाही. आम्ही मातोश्रीवर भेटणार आहोत. त्यात निर्णय घेऊ. हे प्रत्येकवेळी समजतं असं नाही. त्यामुळे काँग्रेसला दोष देणार नाही. आम्हीही अशा प्रकाराला सामोरे गेलो आहोत. पण भविष्यात समन्वय ठेवला तर असे प्रसंग होणार नाही,पाच जागांसाठी एकत्र बसून चर्चा व्हायला हवी होती. पण ते झाल्याचं दिसत नाही. मी कुणाला दोष देत नाही. नागपूर, अमरावतीबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्यायला हवा होता. अमरावतीत काँग्रेसकडे उमेदवार नव्हता. त्यांनी आमचा उमेदवार घेतला. असे देखील राऊत म्हणाले.