Satara Dcc Bank : भाजपने महायुतीचा धर्म पाळला पण, मित्रपक्षांकडून दगाफटका; जयकुमार गोरेंचा हल्लाबोल!

साताला जिल्हा बॅंक निवडणुकीत भाजपने महायुतीचा धर्म पाळला. पण, मित्रपक्षांकडून काही ठिकाणी दगाफटका केल्याचा आरोप जयकुमार गोरे यांनी केला आहे.

Untitle (1)

Untitle (1)

Jayakumar Gore : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी महायुतीमधील मित्रपक्षांवर हल्लबोल केला आहे. भाजपने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रामाणिकपणे महायुतीचा धर्म पाळला. पण, मित्रपक्षांकडून काही ठिकाणी दगाफटका केल्याचा आरोपही गोरे यांनी केला. भाजपने स्वबळावर निवडणूक लढविली असती, तर जिल्हा बँकेत विजय मिळविला असता, असे सांगत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी मित्रपक्षांच्या भूमिकेवर निशाणा साधला.जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित संचालक अर्जुन काळे व इतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बँकेच्या एकूण २१ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महायुतीने आपले वर्चस्व कायम राखले आहे. भाजपने सर्वाधिक ९ जागा जिंकल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेसने ८, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ४ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे बँकेवर महायुतीचीच सत्ता राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सातारा जिल्हा बँकेच्या पाटण सोसायटीतून शिवसेनेच्या शंभुराज देसाई यांच्या गटाने विजय मिळवला. पाटण सोसायटीत शंभुराज देसाई यांना 42 वर्षांनी विजय मिळाला आहे. तर सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतिष्ठेच्या झालेल्या लढतीत जयकुमार गोरे यांनीही बाजी मारली. माण सोसायटी गटातून जयकुमार गोरे यांनी त्यांचे बंधू शेखर गोरे यांचा पराभव केला.

जयकुमार गोरे यांना 53 मतं मिळाली, तर राष्ट्रवादीच्या मनोज पोळ यांना 14 आणि शेखर गोरे यांना अवघी सात मतं मिळाली. फलटण सोसायटीमधून संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा विजय झाला असून समशेरसिंह निंबाळकर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. समशेरसिंह नाईक निंबाळकर हे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू आहेत.

Exit mobile version