Sharad Pawar Speek On Sanjay Raut : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनामा सत्रानंतर आता राजकीय चर्चाना उधाण आले आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून यावर टिप्पणी केली. यावर शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. आम्ही पक्षात काय करतो हे राऊतांना माहिती नाही, अशा शब्दातच शरद पवार यांनी राऊतांना नाव न घेता उत्तर दिले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तिन्ही पक्षातील नेत्यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होते की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.
शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र कार्यकर्त्यांच्या तसेच नेत्यांच्या आग्रहास्तव त्यांनी आपला निर्णय मागे घेत पुन्हा पक्षाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. दरम्यान त्यांच्या या राजीनामा सत्रानंतर राजकारणात मोठ्या चर्चाना देखील उधाण आले. यातच महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला ठाकरे गट यांचे नेते खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणावर भाष्य केले. राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेले सामनातून पवारांच्या राजीनाम्यावर भाष्य केले.
सामनामध्ये नेमकं काय म्हंटले होते?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा शरद पवार यांनी करताच खळबळ माजणे साहजिकच होते. ही खळबळ देशाच्या राजकारणात माजली, त्यापेक्षा जास्त त्यांच्या पक्षात माजली. कारण शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत.
त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ‘राष्ट्रवादी’असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, चालवला व टिकवला. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा-बुडखा, बुंधा… सर्व काही महाराष्ट्रातच असल्याने पवारांच्या सर्वच सहकाऱ्यांना जे हवे आहे ते महाराष्ट्रातच. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले.
राऊतांना पवारांचे प्रत्युत्तर
आम्ही पक्षात काय करतो हे त्यांना माहिती नसतं. आम्ही सगळे सहकारी चर्चा करत असतो व निर्णय घेत असतो. पण आम्ही बाहेर जाऊन याची प्रसिद्धी करत नाही. हा आमचा कुटुंबाचा प्रश्न आहे. आम्ही सर्वजण पक्ष पुढे कसा जाणार यासाठी प्रयत्नशील असतो. नेतृत्वाची नवीन कमान कशी तयार केली जाईल यासाठी आम्ही सर्वजण चर्चा करत असतो.
पुढे बोलताना पवार म्हणाले,पक्षातील अनेकांना कॅबिनेट मंत्री करुन संधी दिली. आम्ही कुणाला संधी दिली आणि काय केलं हे जाहिर करत नाही. त्यामुळे कुणी आमच्यावर टीका केली तर दुर्लक्ष करतो. सामना अग्रलेखाल महत्त्व देत नाही. त्यांना काय लिहायचं ते लिहूदे हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही काय करतो ते आम्हाला ठाऊक आहे. पक्षात काय होतं तो आमचा घरातला प्रश्न. आम्ही आमचं काम करतो त्यांना काहीही लिहू दे. अशा शब्दात एकप्रकारे पवार यांनी संजय राऊत यांना शाब्दिक टोला लगावला आहे.