पुणे :’चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी आज त्यांच्या आत्मपरिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. जगताप कुटुंबियांना या आघातातून सावरण्याचे बळ मिळो.’ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथे भाजपचे चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी जगताप कुटुंबियांना या आघातातून सावरण्याचे बळ मिळो. अशी सांत्वना व्यक्त केली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे भाजपचे चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्याची माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी जगताप कुटुंबियांसोबतचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. तसेच त्यांनी यावेळी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत श्रद्धांजली देखील वाहिली.
भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारीला निधन झाले. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर बाणेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. जगताप यांची गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. ते तीन टर्म आमदार राहिले आहेत. 2014 व 2019 मध्ये चिंचवड मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. तसेच महानगरपालिकेचे महापौरपदही त्यांनी भूषविले आहे. काही दिवसांपूर्वी दुर्धर अशा आजारावर त्यांनी मात केली अस बोलले जात होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणादेखील होत होती. पण दिवाळीनंतर त्यांना पुन्हा प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. 3 जानेवारीला दुपारी तीन ते सहा या वेळेत पार्थिव अत्यंदर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात आले होते.