Sheetal Mhatre : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा एका मॉर्फ केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्याविरोधात गुन्हा देखील झालेला आहे. त्यावरुन आज विधानसभेत जोरदार हंगामा झाला. शिंदे गटाच्या नेत्या यामिनी जाधव व भाजपच्या आमदार मनिषा चौधरी यांनी या कृत्याचा निषेध केला आहे. तसेच ज्यांनी कोणी हा व्हिडीओ व्हायरल केला त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
एका महिलेने कितीवेळा स्वत:ला सिद्ध करायचे, असे यामिनी जाधव म्हणाल्या आहेत. तसेच या घटनेमागचा मास्टरमाईंड कोण आहे ते शोधून त्याला शासन करा, असे आमदार मनिषा चौधरी म्हणाल्या आहेत. हा एका महिलेच्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. याआधी देखील त्यांच्याविषयी टॉयलेटमध्ये घाणेरडे लिहिण्यात आले होते. याप्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. मला यावर मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडून उत्तर हवे आहे, असे चौधरी म्हणाल्या आहेत.
Sheetal Mhatre यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल करणारे दोघे गजाआड!
या प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन दोषींना तातडीने शिक्षा करावी याची मागणी सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली. यावरुन सभागृहात जोरदारा हंगामा झाला. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेचे कामकाज 10 मिनीटांसाठी स्थगित केले आहे.
दरम्यान याप्रकरणावर शीतल म्हात्रे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर माझा आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. परंतु, हा व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल करण्यात येत आहे, असा आरोप शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी केला आहे. आपली बदनामी करण्यासाठी हा खोटा व्हिडीओ तयार करण्यात आला असून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा यामागे हात असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे.