मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण (Dhanushyaban)चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या गटाला दिले आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आयोगाने दिलेल्या निकालावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. शिंदे यांना शिवसेना नाव मिळाल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला असून ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. आता खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी एकनाथ शिंदेंनी आपला बाप बदलल्याची टीका केली आहे.
नियमानुसार जे काही असेल ते आम्ही ताब्यात घेऊ असं विधिमंडळ कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर भरत गोगावले यांनी म्हटलं आहे. यावर राऊत म्हणाले, शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेण्यासाठी पळवापळवी आणि चोरी असे जे प्रकार सुरू आहेत. हिंमत असेल तर त्यांनी सनदशीर मार्गाने कमावावे आणि त्यावर मालकी सांगावी. शिवसेनेच्या मालकीचे जे आहे त्यावर ताबा मिळवायचा आणि आयत्या बिळात नागोबा व्हायचे. आता तर एकनाथ शिंदे यांनी आपले बाप सुद्धा बदलले. आधी बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे पिता होते. आता अमित शहा त्यांना वडिलांसारखे झाले आहेत. त्यामुळे दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून घ्यायचे, बाप बदलायचा, नाव बदलायचे हे असे बदमाश लोक आहेत, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
शिंदे गटाने आज विधीमंडळातील शिवसेना कार्यालय ताब्यात घेतले. त्यावरुनही विनायक राऊत यांनी निशाणा साधला आहे. ठाकरे गटाच्या प्रमुखांची सेनाभवनात आज महत्वाची बैठक झाली. या बैठकीपूर्वी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला.
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले, मिंधे गटाच्या चोरांचा सुळसुळाट माजला आहे. मात्र आम्ही शिवसैनिक त्यांना प्रत्युत्तर द्यायला खंबीर आहोत. आता महाराष्ट्रात भाजपच्या माध्यमातून चोरांनी चोरी करण्यास सुरुवात केली आहे. सर्वकाही चोरी करून आपल्या घरी नेण्यासाठी हे लुटारू काम करत आहेत. परंतु आम्ही घाबरणारे नाही.
Thackeray Vs Shinde : ठाकरे गटाला व्हिप लागणार का? घटनातज्ज्ञ काय म्हणतात…
दरम्यान, आमचे शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत आहेत. आजही शिवसेनेचे महाराष्ट्रामधील सर्व जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख इथे शिवसेना भवनात बैठकीसाठी आले आहेत. आम्ही चोरांना त्यांची जागा दाखवून देऊ. आम्ही सर्वोच्च न्यायालयात आज याचिका दाखल केली आहे. आणि आम्हाला विश्वास आहे उद्या, परवा दोन दिवसात सर्वोच्च न्यायालय यावर नक्कीच सुनावणी घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.