मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या धमक्यांमुळं शिंदे गटाला परराज्यात जावं लागल्याचा दावा शिंदे गटानं निवडणूक आयोगाला दिलेल्या लेखी उत्तरात केलाय. शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्रात पुन्हा आल्यास त्यांचं बाहेर फिरणं अवघड होईल, या संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्याचा दाखला शिंदे गटानं (Shinde Group) लेखी उत्तरामध्ये दिलाय. शिवसेना आणि धनुष्यबाण नेमका कोणाचा? याचा निवडणूक आयोग (Election Commission) निकाल देणारंय. निवडणूक आयोगानं 30 जानेवारीपर्यंत दोन्ही गटांना लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले होती. लेखी उत्तरात शिंदे गटानं संजय राऊत यांच्यावर परराज्यात जाण्याचं खापर फोडलंय.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयातही (Supreme Court)शिंदे गटानं आम्ही पक्षातच आहोत पण आम्हाला हे पाऊल का उचलावं लागलं याचं कारण देताना संजय राऊतांच्या विधानाचा दाखला दिला. शिंदे गटानं 20 जूनला बंड केलं आणि सूरतला गेले. ते पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, म्हणून त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचं ठाकरे गटानं सांगितलंय. त्यावर शिंदे गटानं संजय राऊत यांच्या वक्तव्याचा दाखला दिलाय. त्यापूर्वी जुलै महिन्यात सर्वोच्च न्यायालयातही शिंदे गटानं हाच दावा केला. त्याचं लेखी उत्तर सोमवारी शिंदे गटानं निवडणूक आयोगाला दिलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डमध्येही याचा उल्लेख केला होता. त्यावरुन सर्वोच्च न्यायालयानं तोंडी निर्देश दिले होते की अशा प्रकारच्या वक्तव्यांपासून त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे.
शिंदे गटानं दिलेल्या लेखी उत्तरावर संजय राऊत म्हणाले की, शिंदे गटानं उल्लेख केलेलं भाषण हे बंडखोर आमदार सूरतहून गुवाहाटीला गेले त्या वेळचं आहे. दहिसरमध्ये हे भाषण केलंय. शिंदे गटाचे आमादार महाराष्ट्रात आल्यावर यांना दंडूक्यानं बडवा, पार्श्वभाग सूजवून काढा असं त्यांच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी शिवसेनेच्या व्यासपीठावरुन केलं होतं.
पुढं त्या गुवाहाटीला जाऊन शिंदे गटात सहभागी झाल्या. शिंदे गटातील नेते प्रत्येक वेळी आपली भूमिका बदलताना दिसताहेत, त्यांना उत्तर द्यायला आपण बांधील नाही. हे त्यांचं वैफल्य आहे. शिंदे गट हा निवडणूक आयोगातील लढाई असो किंवा सर्वोच्च न्यायालयातील, ते हारणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.