परभणी: राज्यातील राजकारणात दररोज काहींना काही घडत आहे. यातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या ठाकरे गटाची आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची युती झाली होती. आता या युतीवर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. कडू यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
बच्चू कडू म्हणाले, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती कालच तुटली आहे. वंचित बहुजन आघाडचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली. केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे. त्यामुळे दोघांची युती तुटल्याचं स्पष्ट आहे, असा दावा कडू यांनी केला आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदींची स्तुती केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी कारवाई करतात ती योग्य आहे. ईडीकडून होत असलेल्या कारवाईला मोदींनी पाठिंबा दिला आहे. यावर बच्चू कडू म्हणाले, प्रकाशजी खरे बोलले आहे. त्यांची भाजपसोबत युती होऊ शकते.
दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्यात शिवशक्ती व भीमशक्ती यांची युती झाली होती. युती झाल्यापासूनच तो चर्चेचा विषय ठरला आहे. युती झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या काही वक्तव्यांमुळे नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध देखील रंगले आहे. यामुळेच खरेच ही युती टिकणार की तुटणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.
राज्यपाल वादग्रस्त राहिले…
राज्यपाल हा राज्य चालवत नाही. मुख्यमंत्रीच राज्य चालवतात. पण राज्यपालांच्या काही आवश्यकता असतात. राज्यपाल जाणार की थांबणार हा विषय महत्त्वाचा नाही. पण राज्यपाल वादग्रस्त राहिले आहेत, असं ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्तुती केली. शिंदे प्रचंड काम करत आहेत. रात्री दोन वाजता गेलो तरी मुख्यमंत्री भेटतात. मुख्यमंत्री हिराच आहे. हिरा कही भी चमकता है, असंही ते म्हणाले.