Download App

Political News : शिंदेंची ढाल तलवार आता छत्तीसगडमध्ये चालणार; आगामी निवडणुकांसाठी हालचाली सुरु

नवी दिल्ली : शिवसेना फुटीनंतर ठाकरे गट व शिंदे गट निर्माण झाला आहे. यातच आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बाळासाहेबांची शिवसेना आता महाराष्ट्रानंतर छत्तीसगडमध्ये देखील आपले राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी हालचाली करू लागले आहे. नुकतेच छत्तीसगडमधील रायपूर येथे संमेलन पार पडले. यावेळी उपस्थित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगमी निवडणुकांसाठी शक्तिप्रदर्शन देखील केले.

यावेळी उपस्थित शिंदे गटाचे राष्ट्रीय सचिव अभिजित अडसूळ हे देखील या संमेलनाला उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, आतापर्यंत धनंजय परिहार येथे शिवसेनेचे काम करत होते. मात्र नेतेमंडळी या ठिकाणी येत नव्हते. मात्र आता खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची शिवसेना तयार झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे येथे आम्ही रणनीती आखू.

तसेच एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी निवडणुकांमध्ये आम्ही छत्तीसगडमध्ये यश मिळवू. आगामी निवडणूक भाजपला सोबत घेऊन लढणार का ? यावर अडसूळ म्हणाले, प्रत्येक पक्षाला स्वतंत्र लढण्याचे तसेच आपला पक्ष वाढवण्याची इच्छा असते. जर भाजपाला वाटले की निवडणुकांसाठी शिवसेना पक्षाची ताकद आहे तर आम्ही युती करून निवडणूक लढू अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढू.

छत्तीसगडमध्ये भ्रष्टाचारी सरकार आहे. विकासाच्या मुद्द्यांना या ठिकाणी डावलले जात आहे. मात्र येथील विकासाच्या दृष्टीने शिवसेना येथील वेगवेगळे मुद्दे पुढे घेऊन जाऊन त्यांना न्याय कसा दिला जाईल याकडे लक्ष केंद्रित करणार आहे . तसेच ज्या गोष्टींना विरोध करायचा त्यांना विरोध देखील करेल.

शिंदे गटाचे धनंजय परिहार म्हणाले छत्तीसगड मधील सत्ताधारी आपली कामे व्यवस्थित करत नाही. त्यांच्याविरोधात आमची लढाई आहे. म्हणून आम्ही निवडणुकांमध्ये उतरत आहोत. आम्ही आगामी निवडणुकांमध्ये 45 विधानसभा लढणार आहे. प्रत्येक ठिकाणी सभेचे आयोजन केले जाणार आहे. मुख्यमंत्री शिंदेकडून एक वाहन देखील देण्यात आले आहे. ज्याचा वापर प्रचारासाठी केला जाणार आहे. तसेच प्रचारासाठी एक रथ देखील करण्यात येणार आहे. अशी माहिती परिहार यांनी दिली आहे.

Tags

follow us